आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- तब्ब्ल 12 तासानंतर पश्चिम रेल्वेची कोंडी सोडवण्यात रेल्वे कर्मचा-यांना यश आले आहे. नुकतीच अंधेरीहून चर्चगेटकडे पहिली लोकल रवाना झाली आहे. अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रेल्वेचे जवळपास पाचशे कर्मचारी रेल्वेसेवा पुर्ववत रूळावर आणण्यासाठी झटत होते. अखेर मुंबईची रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाल्याने मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
आज (मंगळवार) सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या होत्या. या दुर्घटनेत दोन पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एनडीआपएफ, अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संपुर्ण मार्ग सुरळीत होण्यासाठी उद्याचा दिवस उजाळणार असल्याचे माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान अंधेरीहून वडाळ्याच्या दिशेने तसेच चर्चगेटकडेही वाहतूक सुरु झाली आहे. तब्बल सात तासांनंतर पहिली लोकल रवाना झाली होती.
हेही वाचा... Bridge Collapsed: अंधेरीत पादचारी पुल कोसळला पाहा Video आणि Photos
पश्चिम रेल्वे आणि महापालिकेत हद्द वाद..
सन 1960 मध्ये बांधण्यात आलेला गोखले पूल कोसळल्यानंतर आता पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेत हद्दीचा वाद सुरु झाला आहे. अंधेरीचा गोखले पूल हा रेल्वे प्रशासनाच्याच अखत्यारित येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. दुसरीकडे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा...आधी एल्फिन्स्टन..आता अंधेरीतील गोखले ब्रिज; मुंबईत या स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी
मुंबईकरांचे जीव जातात जबाबदारी कुणाची?
एल्फिन्स्टन घटनेनंतर सरकारने दावा केला की सर्व पुलांचे ऑडिट करु. मात्र त्यानंतरही अशी घटना घडते, हे संतापजनक आहे. मुंबईकरांचे जीव जातात जबाबदारी कुणाची? मुंबई महापौर बौद्धिक दिवाळखोर झालेत का काय अशी शंका विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली आहे.
शिवसेना-भाजप जबाबदारी ढकलत आहे- मुंडे
दुसरीकडे, रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईचे आहेत. त्यांना मुंबईच्या अडचणी माहीत आहेत. मात्र असे असूनही केंद्र सरकार मुंबईच्या विकासाला निधी पुरवत नाही. शिवसेना-भाजप जबाबदारी ढकलत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. तर गोखले पूल फुटपाथ दुर्घटनेची संपूर्ण चौकशी रेल्वेने करावी. प्रशासनाने सर्वात आधी नागरिकांची काळजी करावी असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत कालपासून (सोमवार) संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे लोकल रेल्वे आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोसळलेल्या पुलाचा भाग लवकरात लवकर रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी आपत्ती निवारण पथक प्रयत्न करत आहे. ढिगाऱ्याखाली एक जण अडकले असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.
जबाबदारी कोणाची? रेल्वेने चौकशी करावी- मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे
'हा पुल पडण्याचे कारण काय? जबाबदारी रेल्वेची होती का महापालिकेची होती? याबाबतीची पुर्ण चौकशी रेल्वेने करावी, अशी विनंती मी रेल्वे मंत्रालयाला केली आहे.', असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी या दुर्घटनेनंतर म्हटले आहे. 'हा पुल वापरात नव्हता, तर त्याचे ऑडीट का झाले नाही. त्याला वेळीच का पाडण्यात आले नाही? या सर्वांची चौकशी व्हायला हवी. रेल्वे आणि पालिकेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी करण्यापेक्षा प्रथम प्रवाशांची काळजी घ्यायला हवी.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.
हेल्पलाईन नंबर जारी...
अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. अंधेरीसाठी ०२२६७६३००५४, चर्चगेट ०२२६७६२२५४०, बोरवली ०२२६७६३४०५३ तसेच मुंबई मध्यसाठी ०२२६७६४४२५७ यावर संपर्क केला जाऊ शकतो.
दरम्यान, बुधवार 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर, 6 जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होईल आणि या अाठवड्यात 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा कोसळलेल्या पुलाचे फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.