आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- नाताळाच्या दिवशी मुंबईकरांना पहिल्या वातानुकूलित रेल्वे प्रवासाचा आनंद अनुभवता येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता बोरिवलीवरून चर्चगेटच्या दिशेने ही पहिली वातानुकूलित लोकल धावणार आहे. जीपीएस यंत्रणा, अग्निशमन उपकरणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन आणि प्रवाशांमध्ये संवाद साधण्याची अत्याधुनिक यंत्रणा अशा विविध वैशिष्ट्यांसह धावणाऱ्या या लोकलबद्दल मुंबईकरांना उत्सुकता आहे. सध्याच्या प्रथम वर्गाच्या प्रवासी भाड्याच्या जवळपास सव्वापट अधिक इतके भाडे या वातानुकूलित लोकलचे असेल.
एप्रिल २०१५ मध्येच ही लोकल चेन्नईच्या यंत्रशाळेतून मुंबईत दाखल झाली. गेली दोन वर्षे कुर्ला आणि विरार कारशेडमध्ये या लोकलची चाचणी घेतली जात होती. सोमवारपासून पश्चिम रेल्वेवर या वातानुकूलित लोकलच्या १२ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी अकरा जलद फेऱ्या आणि धिम्या गतीची एक फेरी असणार आहे.
आठवड्याच्या शेवटी एक दिवस मात्र देखभाल दुरुस्तीसाठी ही लोकल धावणार नाही. उपनगरीय लोकल गाड्यांमधील स्वयंचलित दरवाजे असलेली ही पहिलीच लोकल असेल. या लोकलची प्रवासी क्षमता पाच हजार ९६४ इतकी असून त्यापैकी एक हजार २८ प्रवाशांना बसून, तर चार हजार ९३६ प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार आहे.
काय असतील सुविधा?
- पॅसेंजर अलार्म इंडिकेशन लाइट : प्रत्येक कोचमध्ये हे लाइट असणार असून आपत्कालीन स्थितीत एखाद्या प्रवाशाने साखळी अोढल्यास अलार्मसह या लाइट्स लागतील.
- मोटरमन आणि प्रवाशांमध्ये संवादासाठी एक अद्ययावत यंत्रणा असणार आहे.
- आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठीची यंत्रणा
- प्रत्येक कोचमध्ये दोन अग्निशमन उपकरणे असणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.