आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाणार रद्दचा कागद आणा, तुमचे पाय धुऊन पाणी पिऊ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेने आणला, शिवसेनेच्याच उद्योगमंत्री- पर्यावरणमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली, असा आरोप करत प्रकल्पग्रस्त चौदा गावांनी सोमवारी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकला अाहे. “तुम्ही येताना प्रकल्प रद्द केल्याचा कागद आणा, तुमचे पाय धुऊन आम्ही पाणी पिऊ,’ असे आवाहन या गावकऱ्यांनी उद्धव यांना केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बहिष्काराने इतर गावांतील लोक आणून शिवसेना पक्षप्रमुखांची सभा पार पाडण्याचे संकट शिवसेनेवर ओढवले आहे.   


सोमवारी दुपारी कात्रादेवी-सागावे परिसरात उद्धव यांची सभा आहे. सभेच्या नियोजनासाठी स्थानिक खासदार विनायक राऊत राजापुरात तळ ठोकून आहेत. प्रकल्पग्रस्तांचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रकल्पबाधित मंडळी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांचे नेते अशोक वालम म्हणाले, आम्ही २८ नोव्हेंबर रोजी उद्धव यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी नागपूर अधिवेशनानंतर जमिनी अधिसूचित केलेला आदेश रद्द करण्यात येईल, असे वचन दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. त्यामुळे आमच्या चौदा गावांतील ३२०० कुटुंबीयांपैकी कोणीही त्यांच्या सभेला जाणार नाही. रविवारी दिवसभर कोकणवासीयांची मुंबईतील मंडळे कोकणात फोनाफोनीत मग्न होती. अनेक मंडळांच्या बैठका झाल्या व त्यांनी उद्धव यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचे निरोप पाठवले आहेत.  एकूणच उद्धव यांची ही सभा कोकणातील शिवसेनेसाठी अग्निपरीक्षा आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व खाती शिवसेनेकडे आहेत. मात्र, प्रकल्प रद्दही करता येत नाही आणि त्याला पाठिंबाही देता येत नाही, अशा विचित्र कात्रीत शिवसेना सापडली आहे.  

 

प्रकल्पात सेनेचे हजारो एजंट, तरीही बहिष्कार  
सोमवारची उद्धव यांची सभा मोठी होईल. कारण नाणार प्रकल्पात शिवसेनेचे हजारो एजंट कार्यरत आहेत. जमीन खरेदी-विक्रीतून त्यांनी मोठी माया कमावली आहे. ही मंडळी इतर गावांतून सभेसाठी लोक आणतील. मात्र, शिवसेनेचा नाणार प्रकल्पातील सहभाग आता उघड झाला आहे. त्यामुळे आम्ही सभेवरील बहिष्कारावर ठाम आहोत. 

नितीन जठार, सरचिटणीस, कोकण रिफायनरी प्रकल्पविराधी संघटना  

 

बहिष्काराची अफवा पसरवली जात आहे  

नाणारच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी प्रकल्प समर्थक कामाला लागले आहेत. या समर्थकांच्या माध्यमातून उद्धव यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची अफवा पसरवली जात अाहे. सभेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त खोटे आहे.   
विनायक राऊत, खासदार, शिवसेना   

बातम्या आणखी आहेत...