आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: राणे- भुजबळांची भेट, पदवीधरसाठी पक्षाचा उमेदवार; राणेंची तोफ आज धडाडणार,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी आज दुपारी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या दोघांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. वांद्र्यातील एमईटी संस्थेत ही भेट झाली. भुजबळ हे तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राणे- भुजबळ यांची ही पहिलीच भेट आहे. राणे- भुजबळ हे 90 च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक होते. मात्र, पुढे त्यांनी आपल्या राजकीय वाटा वेगळ्या केल्या. मात्र, त्यांच्यातील वैयक्तिक संबंध कायम आहेत. भुजबळ तुरूंगातून बाहेर आल्यानंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते मात्र आता ते बाहेर आल्यानंतर विविध नेते भुजबळ यांची भेट घेत आहेत. आज राणेंनी त्यांची भेट घेतली. 

 

राणेंची तोफ आज धडाडणार-

 

दरम्यान, नारायण राणे आज सायंकाळी 6 वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते.

 

मुंबईत प्रथमच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद काय आहे, हे मुंबईकरांना दाखवून दिली जाणार आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नारायण राणे यांची पुढील खेळी काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूका तसेच होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने नारायण राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुंबईतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नारायण राणे यांचा हा मुंबईतील मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

मुंबई पदवीधरसाठी राणेंच्या पक्षाचा उमेदवार-

 

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 25 जून रोजी होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेला शह देण्यासाठी राणे हे सज्ज झाले असून, मुंबई ग्रॅज्युएट महासंघाचे अध्यक्ष राजू धोंडिबा बंडगर यांना निवडणूक रिंगणात उतरवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे त्यांना पुरस्कृत केले आहे. बंडगर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी कोकण भवन, बेलापूर येथे दाखल केला. 

 

या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबईत शिवसेनेला शह देण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. शिवसेनेने दीपक सावंत यांचा पत्ता कापून विलास पोतनीस यांना मैदानात उतरवले आहे. तर, भाजपने अमित महेता यांना उमेदवारी दिली आहे. भाजप राणेंच्या पक्षाला पाठिंबा देईल असे सांगितले होते मात्र, आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. विलास पोतनीस (शिवसेना), अमित महेता (भाजप), राजेंद्र कोरडे – शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा), राजू बंडगर (राणेंचा स्वाभिमानी पक्ष), जालिंदर सरोदे (शिक्षक भारती) आणि दीपक पवार (अपक्ष) आदी उमेदवार रिंगणात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...