आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: 26/11 चे साक्षीदार ‘नरिमन हाऊस’ हाेणार संग्रहालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार ठरलेल्या प्रसिद्ध नरिमन हाऊसचे आता संग्रहालयात रूपांतर होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. नेतन्याहू या आठवड्यात मुंबईलाही भेट देणार आहेत. मुुंबईच्या कुलाबा या गर्भश्रीमंत भागात वसलेले नरिमन हाऊस हे छाबड हाऊस नावानेही आेळखले जाते. छाबड- ल्युबावित्झ ही ज्यू संघटना उभारत असलेल्या या संग्रहालयाचे मूळ उद्देश लोकांना शिक्षित करणे आणि सर्व चांगल्या कृतीसाठी प्रेरक ठरवणे हाच असेल. रॅबी गॅव्हरियल आणि त्यांची पत्नी रिवका हॉल्त्झबर्ग यांचे निवासस्थान याच ठिकाणी होते. त्यामुळे संग्रहालयात ते तसेच ठेवले जाणार आहे. इमारतीच्या वर एक उद्यान तयार केले जाईल. त्या ठिकाणी २६/११ हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाची नावे लिहिली जाणार आहेत. दहशतवादी हल्ला परतावून लावताना एनएसजीच्या कमांडोंनी लढवलेली झुंजही चित्रांच्या माध्यमातून येथे दाखवली जाईल. गोळीबारादरम्यान झाडलेली काडतुसे आणि त्यांचे व्रण पाचव्या मजल्यावर जसेच्या तसेच ठेवले जातील. चौथ्या मजल्यावर संग्रहालय असेल आणि ते सर्वांसाठी खुले असेल.   


संग्रहालयात काय असणार?  
- पहिल्या तीन मजल्यावर नरिमन हाऊसचे मूळ हॉटेल.  
- चौथ्या मजल्यावर संग्रहालय  
- पाचव्या मजल्यावर गोळीबारादरम्यानची काडतुसे आणि व्रण  
- शेवटच्या मजल्यावर उद्यान, त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नावांचा उल्लेख. 


मोशेच्या मातापित्याच्या शेवटच्या आठवणी  
नोव्हेंबर २००८ मध्ये नरिमन हाऊसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मालक रॅबी गॅव्हरियल व पत्नी रिवका हॉल्त्झबर्ग यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. तेव्हा केवळ २ वर्षांचा असलेला या दांपत्याचा मुलगा मोशे भारतीय महिलेमुळेे बचावला होता. मरणाच्या दारात असताना रॅबी यांनी मोशेचे चुंबन, तर आईने त्याला मिठी मारली होती.  त्या हल्ल्यानंतर मोशे प्रथमच भारतात आला आहे. ‘आपण आपल्या आईवडिलांचा शेवटचा आवाज याच ठिकाणी ऐकला होता. त्यामुळे नरिमन हाऊस आणि गेट वे ऑफ इंडिया पाहून त्या आठवणींना उजाळा देण्याची प्रचंड उत्सुकता आहे,’ असे मोशेने कळवल्याचे नरिमन हाऊसचे सध्याचे संचालक कोझोलोव्हस्की यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...