आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावखरे यांनी पक्षांतर्गत त्रासामुळे सोडली राष्ट्रवादी, भाजपत जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोकण पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते भाजपत प्रवेश करतील.   


विधान परिषदेचे सभापतींकडे डावखरेंनी सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी सुपूर्द केला, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. राष्ट्रवादीने डावखरेंची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. डावखरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या स्थानिक गटाकडून आपल्या कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही आपल्या वडिलांनाही या गटाने त्रास दिला. तरीसुद्धा त्यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली नाही. या गटाकडून सातत्याने मला डावलले जात आहे. म्हणून, आपण राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला.’


कोकणात जाण्यासाठी भाजप घेणार आधार

नाव कोकण पदवीधर असले तरी या मतदारसंघावर ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे.  एकेकाळी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड होता.   २०१२ मध्ये राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांनी मतदारसंघावर कब्जा मिळवला. दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात भाजप कमकुवत आहे. येथे शिवसेनेचे मोठे आव्हान आहे. सध्या भाजप कोकणात पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहे. डावखरे यांचा प्रवेश त्याचाच भाग समजला जातो.  

 

पक्षाने कधी त्यांच्यावर अन्याय केला नाही
निरंजन डावखरंेना पक्षाने विधान परिषदेची आमदारकी दिली. एकाच वेळी मुलगा व वडिलांना आमदार बनवले. निरंजन यांचे वडील वसंतराव यांना परिषदेचे उपसभापती व उपाध्यक्षपदही दिले. असे असताना पक्षाने अन्याय केला म्हणणे योग्य नाही.
शिवाजी गर्जे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

 

वडिलांच्या निधनाने एकटे, आव्हाडांशी वाद 
निरंजन यांचे पिता वसंत डावखरे ठाण्याचे वजनदार नेते होते.  त्यांच्या मागून येऊन राष्ट्रवादीचे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी बस्तान बसवले. दोघांत वाद होता. वसंत डावखरे होते तोपर्यंत ठीक होते. त्यांच्या मृत्यूनंतर निरंजन एकटे पडले. त्यातून त्यांनी पक्ष सोडला. परिषदेच्या चार जागांची पुढच्या महिन्यात निवडणूक आहे. येथून त्यांना भाजप उमेदवारी देणार आहे.    

 

 

बातम्या आणखी आहेत...