आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे बुधवारपासून राज्यभर 'संविधान वाचवा, देश वाचवा' अभियान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे बुधवारपासून (20 जून) राज्यभर 'संविधान वाचवा, देश वाचवा' अभियान सुरु करण्यात आले आहे. येत्या 20 जून रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे यासंदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, माजी महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे, माजी महिला आयोग सदस्या आशा मिरगे, माजी महिला आयोग सदस्या आशा भिसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

 

आजवर आपला देश समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय या संविधानिक तत्वांना जपत वाटचाल करत आला आहे. मात्र आज याच तत्वांची पायमल्ली होताना दिसत आहे. 'हम करे सो कायदा' अशी हुकूमशाही पद्धत देशात रुजवली जात आहे. या सगळ्या गोष्टींचा विरोध केला तर आवाज दाबला जात आहे. हे देशासाठी धोकादायक आहे, असे मत फौजिया खान यांनी यावेळी व्यक्त केले.

 

मूळ प्रश्न बाजूला ठेवून लव्ह जिहाद, घरवापसी असे विविध मुद्दे उपस्थित करत देशात वाद निर्माण केला जात आहे. दुसरीकडे विचारवंतांच्या हत्या होत आहेत. मध्यंतरी औरंगाबादमध्ये जे घडले त्यात तर पोलीसच दंगल करत होते असे व्हिडीओ समोर आले, हे असे कधी आपल्या महाराष्ट्रात, देशात घडले नव्हते. सर्व सरकारी संस्थांवर ताबा घेतला जात आहे. उन्नाव, कथुवा सारख्या घटना समोर येत आहेत. अनेक लोकप्रतिनिधींवरच बलात्काराच्या केसेस आहेत. न्याय मागायचा तर कुणाकडे असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

देशातील एकही घटक आज समाधानी नाही. सर्वच लोक रस्त्यावर उतरत आहेत म्हणून हे अभियान हाती घेतले असल्याचे खान यांनी सांगितले. युरोपमध्ये महिलांनी क्रांती केली होती आता भारतातही क्रांती करणे गरजेचे आहे. हा दुसरा स्वातंत्र्यसंग्राम आहे. त्यामुळेच महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांना पुढे यावे लागत आहे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे ते समजते. कुटुंब संकटात असेल तर घरातील महिलेलाच ते सावरावे लागते. आपला देश एक कुटुंबच आहे, त्यामुळे त्याला संकटातून वाचवण्यासाठी आम्ही महिला पुढे आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...