आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपच्या गळाला? पुन्हा आमदार होण्यासाठी पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरंजन डावखरे - Divya Marathi
निरंजन डावखरे

मुंबई- राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे पक्षातंर्गत कोंडीला वैतागून भाजपात जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ठाण्यातील स्थानिक नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्याकडून कोंडी केली जात असल्याने निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडण्याच्या मनस्थितीत आल्याचे सांगण्यात येत आहे. डावखरे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायघड्या घातल्या असून, लवकरच ते भाजपवासी होणार असल्याचे समोर येत आहे.

 

निरंजन डावखरे हे वसंत डावखुरे यांचे राजकीय वारसदार आहेत. वसंत डावखरे हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे. सोबतच डावखरे यांचे सर्वपक्षीयांसोबतच शिवसेनेशी उत्तम संबंध होते. जानेवारी 2018 मध्ये वसंत डावखरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे निरंजन डावखरे राजकारणात सध्या एकाकी पडले आहेत. जुलै 2012 मध्ये ते कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, आता राष्ट्रवादीकडून त्यांना संधी दिली जाईल का याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. ठाणे राष्ट्रवादीत सध्या जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचाच शब्द चालतो. 

 

कोकण पदवीधर मतदारसंघातून या दुकलीने डावखरेंऐवजी नवा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे डावखरे यांनी आपले राजकीय अस्तित्त्व टिकविण्यासाठी भाजप-शिवसेनेशी जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच ते भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजप त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून संधी देऊ शकते. 2012 साली भाजपकडून पदवीधर संघातून लढलेले संजय केळकर 2014 साली विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपने डावखरेंना तेथे संधी देण्याचे कबूल केले आहे. सोबतच भाजपला ठाणे पटट्यात शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्यासाठी डावखरेंसारखा तरूण नेत्यांची गरज आहेच. त्यामुळे डावखरेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केल्याचे कळते.

 

2012 साली कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून 5604 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी कोकण पदवीधर मतदारसंघ सुमारे 20 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता. डावखरे यांची एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची तेवढी क्षमता नाही. त्यामुळे जुलै 2018 मध्ये होणा-या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाऊन पुन्हा आमदार होण्याचा डावखरेंचा प्रयत्न आहे. मात्र, यात शरद पवार काही हस्तक्षेप करताहेत हे पाहणे उत्सुकतेचे असेल. जितेंद्र आव्हाड हे पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे पवार हे आव्हाड यांनाच झुकते माप देतील असे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...