आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: उद्घाटनानंतर महापालिकेच्या नव्या इमारतीतून उपराष्ट्रपतींसमोर पावसाच्या पाण्याची गळती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे महानगर महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरूवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे खासदार-आमदारांची झाडून उपस्थिती होती. मात्र, इमारतीचे उद्घाटन थाटामाटात झाल्यानंतर पालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ अचानक आलेल्या पावसामुळे उघडे पडले.

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुणे पालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे गुरूवारी दुपारी उद्घाटन केले. यानंतर काही वेळातच उपराष्ट्रपती नायडू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जावडेकर व्यासपीठावर दाखल झाले. त्याच वेळी पुण्यात ढग भरून आले. कार्यक्रम सुरू होताच बाहेर पाऊस सुरू झाला. यावेळी सूत्रसंचालन करणा-याने मुख्यमंत्र्यांचे कौतूक करताना 'आप आए और बारिश आयी' ही शायरी ऐकवली. मात्र, काही वेळातच उपराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांसमोरच पावसाचे पाणी नव्या इमारतीच्या छतातून गळू लागले. पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी जिथे बसले होते तेथेच पाण्याची गळती सुरू झाल्याने भाजप पदाधिका-यांचे धाबे दणाणले. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे व काम अपूर्ण असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्याला या घटनेने पुष्टी मिळाली.

 

अजित पवारांकडून इमारतीची पाहणी, भाजपला केले लक्ष्य-

 

दरम्यान, पालिकेच्या या नव्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. मात्र, त्यांना निमंत्रण देऊनही कार्यक्रमाला दांडी मारली. दरम्यान, इमारतीचे उद्घाटन घाईघाईने केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी अजित पवारांनी या इमारतीची पाहणी केली होती. त्यावेळी काम चांगल्या पद्धतीने झाले नसल्याचा आरोप पवारांनी करत अधिका-यांची खरडपट्टी काढली होती. तसेच कामे अपूर्ण असल्यानेही नाराजी व्यत्त केली व काही सूचना केल्या. त्यानंतर दुपारी उपराष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांसमोर इमारत गळतीचे चित्र समोर आले. 

 

बातम्या आणखी आहेत...