आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय झालेय आत्महत्यालय, सर्वसामान्यांचा फडणवीस सरकारवरील विश्वासच उडाला- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले आहे. यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या या सरकारच्या काळात झाल्या आहेत. हे सरकार आपल्यासाठी काही तरी करेल, असा विश्वासच सर्वसामान्यांना राहिला नाही, अशा शब्दांत विराेधकांनी मंगळवारी विधानसभेत फडणवीस सरकारवर टीका केली. तर साडेतीन हजारांच्या पुरवणी मागण्यांवर आम्ही फारसे काहीच बोललो नाही, कारण त्यातला एकही रुपया मिळणार नाही, याबाबत आमची खात्री आहे. कारण या सरकारकडे सामान्य शेतकऱ्यांना द्यायला पैसाच नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी हल्ला चढवला.   


मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली चर्चा तसेच नियम २९३ अंतर्गत फसवी कर्जमाफी, मावा, तुडतुडा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सरकारविरोधातील असंतोष या विषयावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत एकत्रित चर्चा करण्यात आली. आपण काय घोषणा करतो याचे भान सरकारने ठेवले पाहिजे. कृषी तसेच मदत व पुनर्वसन विभागात साठ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे कृषी अधिकारी आणि बियाणे कंपन्यांचे संगनमत असल्याचा दावा गुप्तचर विभागाने अहवालात केला आहे. यावर कृषिमंत्री किंवा मुख्यमंत्री काही कारवाई करणार आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केला, तर अजित पवारांनी विमा कंपन्यांच्या कारभारावर टीका केली.   


पीक विम्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांनी ३ हजार ९४८ कोटी भरले, तर विमा कंपन्यांद्वारे मंजूर झालेली नुकसान भरपाईची रक्कम १७२५ कोटी रुपये इतकी आहे, असे सांगत आपण विमा कंपन्यांचा फायदा का करत अाहोत, असा सवाल अजित पवार यांनी केला. हे टाळायचे असेल तर सरकारची विमा योजना काढा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी सूचना त्यांनी या वेळी केली.   


या चर्चेची सुरूवात डॉ. अनिल बोंडे यांनी केली, तर विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, सुभाष साबणे, उन्मेष पाटील, सुनिल केदार, शशिकांत खेडेकर, संतोष दानवे, अमित झनक आणि राजेश टोपे, चंद्रदीप नरके या सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. या चर्चेवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार अाहेत.

 

सदाभाऊ, भाजप तुमचे कधीही भले करणार नाही  

चार वर्षांत भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी काहीच केलेले नाही, हा मुद्दा अजित पवार मांडत असताना ऊर्जामंत्री बावनकुळेंनी त्यावर काही तरी शाब्दिक कोटी केली. त्यावर अजित पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांची चांगलीच फिरकी घेतली. बावनकुळेंना उद्देशून ते म्हणाले की, ‘खरोखर सांगा तुम्ही कुणाचे भले केले? काल-परवापर्यंत एकत्र फिरणाऱ्या सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींमध्ये भांडण लावून दिले. त्यांचे कार्यकर्ते आधी दोघांच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायचे, ते हल्ली एकमेकांच्या गाड्यांवर दगडफेक करताहेत.’ अजित पवारांच्या या मुद्द्यावर सभागृहात बसलेल्या खोतांनाही हसू आवरले नाही. त्यांच्याकडे बघत अजित पवार म्हणाले, ‘सदाभाऊ, खरे सांगतो, भाजप तुमचे कधीच भले करणार नाही. ही बाब आता जानकरांनाही कळली आहे.’ या विधानावर सभागृहात हशा पिकला.

बातम्या आणखी आहेत...