आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घाेटाळ्यात फक्‍त अधिकाऱ्यांवरच गुन्हे; मर्जीतील ठेकेदाराला मात्र संरक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कंत्राटांमधील निविदा प्रक्रियेतील अनियमिततांबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पांमध्येही अशाच प्रकारे निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याबद्दल त्या प्रकल्पांचे ठेकेदार निसार खत्री यांना आरोपी करण्यात आलेले असताना विदर्भात दाखल चारपैकी दोन गुन्ह्यांत ठेकेदारांना मात्र अभय देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एका प्रकल्पाचे ठेकेदार भाजप आमदार मितेश भांगडिया हे आहेत.    


मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवताळा, मेटेपार, चिखलापार कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य पद्धतीने हस्तक्षेप करणे, निविदेचे मूल्य वाढवणे, अपात्र कंत्राटदारास गैरमार्गाने पात्र ठरवणे तसेच पात्र आणि अपात्र कंत्राटदाराने संगनमत (कार्टेलिंग) करून गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे. अशाच पद्धतीच्या अनियमितता गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी शाखा कालवा अस्तरीकरणाच्या कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेतही झाल्याचे दिसून आल्याने हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या वडनेरे समितीने प्रकल्पांमधील अनियमिततांची जी प्रकल्पनिहाय सूची दिली आहे, त्यानुसार मोखाबर्डी प्रकल्पाचे काम मे. एम. जी. भांगडिया यांना देण्यात आले आहे. असे असतानाही या प्रकल्पांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ठेकेदाराला वगळून त्याच्याऐवजी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मे. एम. जी. भांगडिया या फर्मचे ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ असलेल्या फिरदोस खान पठाण यांच्यावर गुन्हा नांेदवण्यात आला आहे, तर गोसेखुर्द उजवा कालव्यावरील घोडझरी अस्तरीकरण प्रकल्पातील अनियमिततांबाबत ठेकेदाराला वगळून फक्त जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


विशेष म्हणजे कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील बाळगंगा आणि कोंढाणे प्रकल्पांमध्येही अशाच पद्धतीने निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याबद्दल त्या प्रकल्पाचा कंत्राटदार निसार खत्री आणि त्याच्या भागीदाराविरोधात गुन्हा दाखल करून त्या सर्वांना अटकही करण्यात आली होती. मग असे असताना विदर्भातील या प्रकल्पांमधील ठेकेदारांना का अभय दिले जात अाहे, असा सवाल उपस्थित हाेत अाहे.  

 

अामदार भांगडिया यांचे  स्पष्टीकरण  
याबाबत भाजपचे आमदार आणि मे. एम. जी. भांगडिया या फर्मचे प्रोप्रायटर मितेश भांगडिया यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला. विदर्भात गुन्हा नोंद झालेल्या चारपैकी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील नवताळा, मेटेपार, चिखलापार कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाचे काम आपल्या फर्मने केल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, गोसेखुर्द उजवा कालव्यावरील घोडझरी अस्तरीकरणाचे काम आपल्या फर्मने केले नसून या कालव्याचे मातीकाम आणि बांधकाम आपण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

बातम्या आणखी आहेत...