आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युग तुलीच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल अग्नितांडवप्रकरणी माेजोस बिस्ट्रोच्या मालकांपैकी एक असलेल्या युग तुलीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. येत्या ११ जानेवारीला तुलीच्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचा अहवालच हास्यास्पद असल्याचा दावा युग तुलीच्या वकिलांनी केला आहे. 


कारवाई टाळण्यासाठी युग तुलीनेही ‘वन अबोव्ह’च्या मालकांचा कित्ता गिरवला आहे. एफआयआरची प्रतच अद्याप आपल्याला मिळाली नाही. तसेच ४ जानेवारीपर्यंत आपल्याविरोधात एमआरटीपी अॅक्टच्या उल्लंघनाव्यतिरिक्त कोणताही गुन्हा दाखल नव्हता, असा दावा तुलीच्या वतीने करण्यात आला आहे. ४ जानेवारी रोजी मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालात आगीला “मोजोस बिस्ट्रो’मधून सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आपल्याविरोधातील कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा तुलीचे वकील अॅड. श्याम देवानी यांनी केला. मात्र, तुलीच्या अर्जावर तातडीने सुनावणीला नकार देत न्यायालयाने हे प्रकरण ११ जानेवारी रोजी सुनावणीसाठी ठेवले आहे. कमला मिल अग्निकांडात १४ जणांचा होरपळून आणि धुराने गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोजोस आणि वन अबोव्ह अशा दोन्ही हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापक अशा पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पाच जणांपैकी फक्त युग पाठक या मोजोसच्या मालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.  


ज्युलियस रिबेरो यांची याचिका  
कमला मिल कम्पाउंड येथील अग्निकांडाची न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलियस रिबेरो यांनी दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची स्थापना करावी. मुंबईतील सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणांचे अग्निशमन दल व महापालिकेमार्फत फायर ऑडिट करून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  विशेष म्हणजे, रिबेरो यांनी याचिकेद्वारे एक गंभीर आरोपही केला आहे. कमला मिल अग्निकांडानंतर महापालिकेने अवघ्या दोन दिवसांत ३०० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. याचा अर्थ महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामे कुठे उभारली गेली आहेत, हे अगोदरच ठाऊक होते. मग असे असतानाही त्यांनी कारवाई का केली नाही, याचा तपास होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.  


वन अबव्हच्या व्यवस्थापकांना न्यायालयीन कोठडी 
दरम्यान “वन अबव्ह’ पबचे व्यवस्थापक केविन बावा आणि लिस्बन लोपेझ यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले करण्यात आले. न्यायालयाने त्यांची आता २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे.

बातम्या आणखी आहेत...