आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त मराठीचा मुद्दा साेडा, सर्वांना साेबत घेऊन ‘लाेकसभा’ लढा; मनसेच्या नेत्यांचा राज ठाकरेंकडे अाग्रह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठीचा मुद्दा सोडून आता सर्वसमावेशक भूमिका घेऊन इतर समाजघटकांना आपलेसे करत आगामी लोकसभा निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवाव्यात, असे मत मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी याबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेते आणि सरचिटणीसांची एक बैठक निवासस्थानी बोलावली होती. अतिशय वादळी ठरलेल्या या बैठकीत पक्षातील घडामोडींबाबत नाराजी व्यक्त करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याचे समजते.   


आधी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत नंतर फक्त सेनेविरोधातच उमेदवार देणाऱ्या मनसेचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुरते पानिपत झाले होते. त्या वेळी मनसे नेतृत्वाने निवडणुका लढवण्याबाबत केलेल्या उलटसुलट विधानांमुळे पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. ती चूक दुरुस्त करण्याच्या उद्देशाने मनसे आता कामाला लागली असून आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी बुधवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुका पक्षाने पूर्ण ताकदीनिशी लढवाव्यात, असे मत बहुतांश सर्वच नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले. तसेच फक्त मराठीच्या मुद्द्यावर अवलंबून न राहता अमराठी समाजघटकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही एका बड्या नेत्याने बोलून दाखवला. मात्र, त्यावर राज यांनी तूर्तास कोणतेही मत व्यक्त केले नसल्याचे समजते. बाळा नांदगावकर म्हणाले की, लोकसभा लढवण्याबाबतची मते नेत्यांनी व्यक्त केली. त्यावर उमेदवार आणि इतर बाबींचा विचार करून निवडणुका लढवाव्यात किंवा नाही याबाबतचा निर्णय ठाकरे घेतील. 


राज ठाकरेंनी नेत्यांवरच फोडले खापर  
बडे नेते पक्ष सोडून जात आहेत. असाच गोंधळ जर पक्षात सुरू राहणार असेल तर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत मी आयुष्यभर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करेन, अशी स्पष्ट भूमिकाही नांदगावकर यांनी घेतल्याचे समजते. हाच धागा पकडत राज यांनी “तुम्ही नेतेमंडळीच माझा मराठीचा मुद्दा किंवा अन्य भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरला अाहात,” असे वक्तव्य केल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...