आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निप्रतिबंधक उपाययाेजना न करणाऱ्या शाळा, लाॅन्सचा पाणीपुरवठा हाेणार खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कमला मिल परिसरातील हाॅटेलमध्ये घडलेल्या अग्निकांडानंतर जागे झालेल्या महापालिकेच्या अग्निशामक विभागाने अाता शहरातील लहान माेठ्या शाळांपासून तर इंटरनॅशनल स्कूल, महाविद्यालये, लाॅन्स, मंगल कार्यालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययाेजना अाहेत की नाही, याचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली अाहे. साधारण फेब्रुवारीत हे सर्वेक्षण सुरू हाेणार असून, त्यात अग्निप्रतिबंधक उपाययाेजनांकडे कानाडाेळा करणाऱ्यांना नाेटीस पाठवून सुधारणा न झाल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार अाहे. 


झपाट्याने विकसित हाेणाऱ्या नाशिक शहरात अग्निशामक विभागाकडून अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत भविष्यातील अनेक दुर्घटनांना अामंत्रण देण्याजाेगी परिस्थिती निर्माण करून ठेवली अाहे. बड्या इमारती, शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये, रुग्णालयात अग्निप्रतिबंधक उपाययाेजना अाहेत का याची खातरजमा करण्याची तसदी संबंधित विभागाकडून घेतली गेलेली नाही. दरवर्षी वर्तमानपत्रात एक नाेटीस प्रसिद्ध करून अग्निप्रतिबंधक उपाययाेजना सुस्थितीत अाहे की नाही याची खातरजमा करणारे फायर अाॅडिट जानेवारी व जुलै या दाेन सहामाहीत मागवले जाते. असे अहवाल फाइलबंद करून पुढील काेणतीही कारवाई हाेत नाही. 


मुंबईतील दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या अग्निशामक विभागाने शहरातील ३८ हाॅटेल्सचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी नोटिसा पाठवल्या. त्यात साधारण ८ हाॅटेल्सची अग्निप्रतिबंधक यंत्रणा समाधानकारक असल्यामुळे त्यांना कारवाईतून वगळण्यात अाले अाहे. मात्र जवळपास ३० हाॅटेल्सवर येत्या अाठवडाभरात पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई हाेणार असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल महाजन यांनी सांगितले. हाॅटेल्सबराेबरच रुग्णालयांमधील अग्निप्रतिबंधक उपाययाेजनांबाबत कारवाई सुरू अाहे. त्यापाठाेपाठ तळघरांचेही सर्वेक्षण अंतिम टप्प्यात अाले अाहे. हे दाेन्ही सर्वेक्षण संपल्यानंतर महापालिका शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालये, लाॅन्सचे सर्वेक्षण करून त्यात अग्निप्रतिबंधक उपायांकडे कानाडाेळा करणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले. 


मनुष्यबळ नसल्यामुळे करणार काय? 
स्वतंत्र माहिती ठेवण्यासाठी मनुष्यबळ नाही. त्यामुळे कारवाईत अडचणी येतात. फायर अाॅडिट किती अास्थापनांनी केले पाहिजे याबाबतची अाकडे नाही. ज्यांनी सादर केले त्यांची माहिती देऊ शकताे. 
- अनिल महाजन, मुख्य अग्निशामक अधिकारी, महापालिका 


महाजन यांची कार्यपद्धती संशयास्पद 
महापालिका क्षेत्रात किती शाळा, महाविद्यालय, किती बड्या इमारती, हाॅटेल्स, हाॅस्पिटल व बड्या अास्थापना अाहेत, याचीच माहिती अग्निशामक विभागाकडे नाही. दरवर्षी जानेवारी व जुलैत दाेन टप्प्यांत वर्तमानपत्रात फायर अाॅडिट करून महापालिकेला सादर करण्याबाबत नाेटीस दिली जाते. मात्र त्यानंतर किती अास्थापनांनी फायर अाॅडीट केले, किती अास्थापनांनी नाही त्याचा ताळमेळ ठेवला जात नाही. ज्यांनी फायर अाॅडिट दिले त्यांनी खराेखरच उपाययाेजना केल्या की नाही याची पडताळणी हाेत नाही. त्यामुळे अशा अहवालांना कितपत महत्त्व द्यायचे असाही प्रश्न उपस्थित हाेत अाहे. यासंदर्भात अग्निशामक विभागप्रमुख अनिल महाजन यांनी कर्मचारी नसल्यामुळे करणार काय, असे साेपे उत्तर देत बचाव केला जात अाहे. यामुळे त्यांची कार्यपद्धतीच संशयास्पद असल्याचे जाणवते. भविष्यात दुर्घटना घडली तर अग्निशामक दलाची जबाबदारी काय असेल, या दुर्लक्षाबाबत असाही प्रश्न चिंतनाचा अाणि मंथनाचा अाहे.