आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादातून निरुपा रॉय यांच्या मुलांत ‘दीवार’; थोरल्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत धाकट्याला केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय चित्रपटसृष्टीत आईच्या पात्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री निरुपा रॉय यांच्या पोटच्या मुलांमध्ये संपत्तीच्या वादावरून ‘दीवार’ निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री रॉय यांच्या मुलांदरम्यान संपत्तीवरून जोरदार वाद झाला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. 


 थोरला भाऊ योगेश यांनी दारूच्या नशेत आपल्याला मारहाण केल्याची तक्रार निरुपा रॉय यांचा ४५ वर्षीय धाकटा मुलगा किरण रॉय यांनी पोलिसांत दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किरण यांच्या तक्रारीनुसार, मद्यधुंद अवस्थेत भाऊ योगेशने माझे कुटुंबीय राहत असलेल्या भागात येऊन खिडकीची तावदाने तोडली. शिवीगाळ करत मला मारहाण केली व माझ्या पत्नीलाही धक्का दिला. यामुळे माझी मुले खूप घाबरली. त्यांच्या भीतीने आम्ही स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. तब्बल २० मिनिटे गोंधळ घातल्यानंतर योगेश तिथून निघून गेले. दरम्यान, योगेश यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. वीज बिल मला भरावे लागत असल्याने किरण यांनी घरातील एसी आणि सर्व दिवे मुद्दाम सुरू ठेवले होते. आपण याचा जाब विचारला. मात्र, मारहाण वगैरे केली नाही, असे योगेश यांचे म्हणणे आहे.  

 

वाद नेमका काय?  
निरुपा रॉय यांनी १९६३ मध्ये १० लाखांत मलबार हिल भागातील अॅम्बसी अपार्टमेंटमधील चार खोल्यांचा तळमजला विकत घेतला आहे. ३ हजार चौ. फुटांच्या या घरासोबत त्यांची ८ हजार चौ. फुटांची बागेची जमीनही आहे. २००४ मध्ये निरुपा रॉय यांचे निधन झाल्यानंतर पती कमल संपत्तीचे मालक बनले. २०१५ मध्ये त्यांचेही निधन झाल्यानंतर किरण व योगेश यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू झाला. घराची मालकी मिळवण्यासाठी योगेश यांनी धमकी दिल्याचा आरोप करत किरण यांनी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात संपत्तीसाठी याचिका दाखल केली. निरुपा यांनी ही संपत्ती मृत्युपत्राद्वारे आपल्या आणि वडीलांच्या नावे केल्याचे किरण यांनी याचिकेत म्हटले होते.  

 

"मेरे पास माँ है,’ हा डॉयलॉग निरुपांसाठीच  
संपत्तीवरून दोन भावांतील बिघडलेल्या संबंधावर आधारित ‘दिवार’ या चित्रपटात निरुपा रॉय यांनी अमिताभ बच्चन आणि दिवंगत शशी कपूर यांच्या आईची भूमिका साकारली होती. शशी कपूर यांचा ‘मेरे पास माँ है’ हा डॉयलॉग याच चित्रपटातील आहे. निरुपा रॉय यांनी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांत दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यातील बहुतांश चित्रपटांत त्या आईच्या भूमिकेत होत्या.

बातम्या आणखी आहेत...