आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीच न नेलेल्या दीड लाख टपालांचा हाेणार लिलाव; 5 हजार पार्सलमध्ये महागड्या वस्तू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील ५ वर्षांपासून काही कारणास्तव इच्छित स्थळी न पोहोचू शकलेल्या आणि त्यावर अद्याप कुणीच दावा न केलेल्या सुमारे १ लाख ६२ हजार टपालांचा पोस्ट खात्यांकडून लिलाव केला जाणार आहे. या टपालांपैकी काहींमध्ये मोबाइल, कॅमेरा, घड्याळ किंवा अन्य महागड्या वस्तूही आहेत. 


मुंबईतील मुख्य टपाल कार्यालयातील  रिटर्न लेटर ऑफिसला (आरएलओ) प्राप्त आकडेवारीनुसार, या बेवारस टपालांमध्ये १ लाख ५७ हजार रजिस्टर आणि स्पीड पोस्ट पाकिटे असून मागील ५ वर्षांपासून ती स्वीकारायला किंवा परत घ्यायलाही कुणीच आले नाहीत. दरम्यान, विविध प्रकारच्या वस्तूंसह असलेले ५ हजार ७१६ पार्सलही अद्याप राज्यभरातील विविध टपाल कार्यालयांमध्ये पडून आहेत. टपाल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १९ मे २०१५ रोजी आम्ही अशा बेवारस पार्सलचा लिलाव केला होता आणि त्यातून सुमारे ५४, ०५९ रुपये गोळा झाले होते. आम्ही लिलावासाठी निविदा मागवली होती. परंतु त्या लिलावात निविदाधारकांनी जास्त रस दाखवला नव्हता. परंतु, टपाल आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम ४३५ नुसार, आम्ही लिलावाची प्रक्रिया सुरू करणार आहोत. त्यासाठी लवकरच वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रकाशित केली जाईल.   

 

५० लाख पत्रे पडून  
योग्य पत्त्याअभावी इच्छित स्थळी न पोहोचू शकलेली ५० लाख ६ हजार पत्रे टपाल कार्यालयांत पडून आहेत. ही सामान्य टपाली पत्रे असल्याने तसेच स्वीकारक तसेच प्रेषकाकडूनही त्याबाबत काहीच विचारणा न झाल्यामुळे ती अशीच ठेवलेली आहेत. काहीच मूल्य नसल्याने या पत्रांचा लिलावात समावेश केला जाणार नाही.   

 

अद्यापही दावा केल्यास टपाल परत देणार 

आमच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित टपाल योग्य स्वीकारकापर्यंत पोहोचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. शिवाय, त्यांच्या प्रेषकाचाही शोध लागू शकला नाही. आरएलओमध्येही संबंधित टपाल आल्यानंतरही प्रेषक आणि स्वीकारक दोघांचाही शोध घेण्यात आला. नियमानुसार संबंधित टपाल फोडून त्यात पत्ता शोधला. तरीही काहीच न मिळाल्याने अखेर लिलाव करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, आताही योग्य व्यक्तीने संबंधित टपालाविषयी संपूर्ण पुराव्यानिशी आमच्याकडे संपर्क केल्यास ते त्यांना परत दिले जातील, अशी माहिती टपाल खात्याचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे पोस्टमास्टर जनरल एच.सी.अग्रवाल यांनी दिली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...