आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी शाळांमधील शिक्षकांची भरतीही राज्य सरकारच करणार; संस्थाचालकांच्या मनमानीला चाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील खासगी शाळांतील शिक्षक भरतीची दोरी सरकारच्या हाती आली अाहे. राज्याच्या शिक्षण विभागाने 'पवित्र' या संगणकीय प्रणालीद्वारे खासगी शाळांतील शिक्षक भरती करण्याचा बराच काळ रखडवलेला निर्णय बुधवारी लागू केला. या बदलामुळे शिक्षक भरतीमधील खासगी शाळा संस्थांचालकांचा हस्तक्षेप यापुढे बंद होणार आहे. यामुळे शिक्षण सम्राटांना मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. 


दरवर्षी मेमध्ये खासगी शाळांत शिक्षक भरती होईल. शिक्षण सेवकांची नियुक्ती कोणत्या संस्थेवर होईल, याबाबतचे नियंत्रण सरकारकडे असेल. समायोजनानंतर वर्षातून २ वेळा शिक्षण सेवकांची भरती होईल. त्यासाठी दरवर्षी अभियोग्य व बुद्धिमत्ता चाचणी होईल. जिल्ह्यातील भरतीची प्रक्रिया जि.प. मुख्याधिकारी व पालिका क्षेत्रात मनपा आयुक्त करतील. 


खासगी शाळांना सरकार अनुदान देते. मात्र संस्था शिक्षक भरती करते. संस्थाचालक नातेवाईक व तसेच मोठ्या रकमा घेऊन शिक्षक भरती करतात. या बाबत शिक्षण विभागाकडे हजारो तक्रारी आल्या होत्या. 


अशी होईल भरती 
१ सर्व खासगी शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद या दरवर्षी १ जानेवारी व १ आॅक्टोबर रोजी रिक्त पदाची माहिती सरल आणि पवित्र प्रणालीवर नोंदवतील. प्रत्येक संस्थेस स्वतंत्र लाॅगिन नंबर दिला असेल. शिक्षणाधिकारी बिंदू नामावली तपासतील. 
२ त्यानंतर संस्थेस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल. जाहिरातीनुसार पात्र उमेदवार पवित्र प्रणालीवर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांसह अर्ज भरतील. जाहिरातीचा कालावधी संपल्यावर शिक्षण संचालक निवडलेल्या उमेदवाराची सूची संकेतस्थळावर जाहीर करतील. 
३ नंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची छाननी होईल. छाननीनंतर उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांना इ मेलने संस्थेकडून पत्र जाईल. विहित मुदतीत शाळेचा मुख्याध्यापक पवित्र संगणक प्रणालीवर शिक्षण सेवकास रुजू करून घेतील. 


उमेदवाराचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा अधिकार संस्थेला 
बुधवारी शिक्षण विभागाने शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया स्पष्ट केली. या भरती प्रक्रियेचे एकूण २२ टप्पे आहेत. यातील ९ क्रमांकाच्या नियमात उमेदवाराचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा अधिकार संस्थेला आहे, परंतु निवड प्राधान्यक्रम गुणांवर होणार असल्याने या नियमानुसार संस्थांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते. 


अशी आहे 'पवित्र' संगणकीय प्रणाली 
शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पवित्र (पोर्टल फाॅर व्हिजिबल टू आॅल टीचर्स रिक्रूटमेंट) नावाची विशेष संगणक प्रणाली विकसित केली आहे. ती राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र घोषित, विनाअनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रियेस यंदापासूनच लागू होईल. 


शिक्षक लवकर द्या 
खासगी संस्थांत शिक्षक भरती सरकारने करण्यास आमची हरकत नाही. २०१३ पासून शिक्षक भरती बंद आहे. शिक्षक लवकर द्या इतकीच आमची मागणी आहे. या निर्णयाचे स्वागत आहे, असे रयत संस्थेचे चेअरमन डाॅ. अनिल पाटील (सातारा) म्हणाले. 


अल्पसंख्याक संस्थांत पूर्वीप्रमाणेच भरती 
अल्पसंख्याक समाजाच्या शाळा यातून वगळल्या आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्वीच्या पद्धतीनुसार सुरू राहील. 

बातम्या आणखी आहेत...