आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी 10 लाखांहून अधिक दंड वसूल, राज्यात कारवाईचा धडाका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारने शनिवारपासून प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर दिवसभर राज्यभर प्लास्टिक वस्तू बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. विविध जिल्ह्यांत या कारवाईदरम्यान पहिल्याच दिवशी १० लाख ९० हजार रुपयांचा दंड पालिका निरीक्षकांनी वसूल केला. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने २३ जूनपासून प्लास्टिकच्या वस्तू आणि थर्माकोलच्या वापराविरोधात कारवाई करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध महापालिकांनी प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली.


ठाण्यात धडक कारवाई, मुंबईत जनजागृती : ठाणे महानगरपालिकेने धडक कारवाई करत तब्बल अडीच टन वजनाच्या प्लास्टिक वस्तू जप्त केल्या, तर नागरिकांकडून अंदाजे ९५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. एकीकडे ठाणे महापालिकेने धडाक्यात कारवाई सुरू केलेली असताना मुंबई महापालिकेने मात्र सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. तसेच मुंबई महापालिका प्रशासनातर्फे शनिवारी एक जनजागृती रॅली काढून प्लास्टिक बंदीचे आवाहन केले.


मुंबई महापालिकेने मात्र सोमवारपासून कारवाईचे नियोजन केल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांनी दिली. शनिवारी महापालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडिया अशी रॅली काढून जनजागृती केल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेने कारवाईसाठी २५० निरीक्षकांचे एक विशेष पथक तयार केले असून त्यांना विशिष्ट गणवेशही देण्यात आला आहे. शहरात ३७ ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची संकलन केंद्रे उभारण्यात आली असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यानंतर बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू आढळल्यास कारवाई करणार असल्याचे खबाले म्हणाले.


पुण्यातून तीन लाख  ६९ हजारांचा दंड वसूल  : पुणे महापालिका प्रशासनाच्या पथकाने पुणे शहरात १५ क्षेत्रीय कार्यालय परिसरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून ७६ जणांवर दंडात्मक कारवाई करत तीन लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणी फिरून दुकानदारांकडून ८ हजार ७११ किलो प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या आहेत. यात प्लास्टिक डिश, चमचे, द्रोण, पिशव्या, ग्लास यासोबत ७५ किलोच्या थर्माकोल वस्तूंचा समावेश आहे. व्यापारी, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करून ३ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारपासून कारवाई सुरू होत आहे.

 

बीड : ११ ठिकाणी छापे

बीड नगरपालिकेने ११ ठिकाणी छापे मारून  विक्रेत्यांना १ हजार पन्नास रुपयांचा दंड ठोठावला.  हिंगोली जिल्ह्यात ८ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात दोन जणांवर  कारवाई झाली. जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात शनिवारी एकही कारवाई करण्यात आली नसून सोमवारपासून मोहीम राबवण्यात येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...