आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निधी उकळण्यासाठीच प्लास्टिक बंदी : राज ठाकरेंचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात २३ जूनपासून लागू झालेल्या प्लास्टिक बंदीला मनसेने विरोध केला आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीपासून राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन पळ काढत असून कोणतीही पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय लोकांंकडून दंड आकारणीला आपला विरोध असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत सरकार प्लास्टिकला पर्याय देत नाही तोपर्यंत नागरिकांनी दंड भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. घाईघाईत लागू केलेल्या या प्लास्टिक बंदीमागे निवडणूक निधी उभारण्याचे राजकारण असावे, असा संशय व्यक्त करत राज यांनी पर्यावरण मंत्र्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 
कृष्णकुंज या निवासस्थानी पत्रकार परिषदेत राज म्हणाले, प्लास्टिकने आपले दैनंदिन जीवन व्यापले असून कोणताही पर्याय न देता घेतलेला हा निर्णय अनाठायी आहे. कारवाईबाबत अजूनही लोकांमध्ये संभ्रम आणि भय असून या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी अजून का मौन बाळगले आहे, असा सवाल त्यांनी केला. हा निर्णय राज्य सरकारचा आहे की फक्त एका खात्याचा, असा सवाल करत एखाद्या मंत्र्याला आलेला झटका हे राज्याचे धोरण होऊ शकत नसल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना लगावला. प्लास्टिकवर बंदी घालायचीच होती तर सगळ्याच प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


रामदास कदमांना केले लक्ष्य
प्लास्टिक बंदीच्या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मनसेच्या भुमिकेबाबत विचारले असता, काकाला कधीपासून पुतण्याची भीती वाटू लागली' अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. कदम यांच्या प्रतिक्रियेबाबत राज यांना विचारले असता, महाराष्ट्रातल्या बहुतांश नद्या प्रदूषित आहेत, त्यांच्या स्वच्छतेबाबत पर्यावरण मंत्र्यांनी पूर्वी केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले, याचे उत्तर कदमांनी द्यावे.हा माणूस इवलीशी बुद्धी असणारा आहे. माझा प्रश्न प्रशासन म्हणून तुम्ही काय केले हा असून त्याचा नात्याशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे कदमांनी नात्यावरून वाद निर्माण करू नये, असे राज म्हणाले. 


मराठेंवर कारवाई आकसापोटी
नोटबंदीनंतर अवघ्या पाच दिवसांत साडेसातशे कोटी जमा करणाऱ्या अमित शहांवर कारवाई नाही, पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मराठेंवर कारवाई कशी होते? महाराष्ट्र सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची चौकशी या रवींद्र मराठेंनी केली होती. अहवालात त्यांनी राज्य सरकारवर ठपका ठेवला होता. त्यामुळे ही कारवाई केली गेल्याचा आरोप राज यांनी केला.  

 

काही दिवसांनी निर्णय मागे पडून स्थिती मूळ पदावर 
राज ठाकरे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, प्लास्टिक उत्पादकांकडून निवडणूक निधी उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांनी लोक हा विषय विसरले की प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे पडून परिस्थिती मूळ पदावर येईल. 

बातम्या आणखी आहेत...