आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 21 मे रोजी मतदान, वेळापत्रक जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच विधान परिषदेच्या सहा सदस्यांचा कालावधी यंदा जून, जुलैअखेर संपुष्टात येत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या रिक्त होणाऱ्या जागांसाठीचा कार्यक्रम शुक्रवारी घोषित केला. २१ मे रोजी  मतदान असून २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.  


कोकण स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे , परभणी पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल्ला खान दुर्राणी, अमरावती स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे मंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजपचे वर्ध्यातून निवडून आलेले मितेश भांगडिया, नाशिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले राष्ट्रवादीचे जयंतराव जाधव, लातूरचे काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांच्या जागेवर ही निवडणूक होत आहे. रिक्त होत असलेल्या या सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागा आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे २३ सदस्य आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ५, शेकाप २, पीआरपी आणि लोकभारती प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. विधानसभेत भाजप, सेनेचे बहुमत असले तरी परिषद विरोधकांची आहे. त्यामुळे सभापतिपद राष्ट्रवादीकडे, तर उपसभापतिपद काँग्रेसकडे आहे.   


राष्ट्रवादीची सद्दी संपणार?  
यंदा या सभागृहातील २२ जागा रिक्त होत आहेत.  त्यात साहजिकच सत्ताधारी भाजपचे पारडे जड राहणार आहे. त्यामुळे वरिष्ठ सभागृहातील सध्या असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

निवडणूक कार्यक्रम  
२६ एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल. ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ७ मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. २१ मे रोजी सकाळी ८ ते ४ या कालावधीत मतदान होईल आणि २४ मे रोजी मतमाेजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

 

बातम्या आणखी आहेत...