आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या जिवाला हिंदुत्ववाद्यांकडून धोका;अॅड. प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दगडफेक करून हिंसाचार घडवण्यात ज्या हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता, त्याच संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.  या वेळी आंबेडकर यांनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांवर टाकण्यात आलेल्या पोस्टचा हवाला या वेळी दिला.   


आंबेडकर म्हणाले, १ जानेवारी रोजी रावसाहेब पाटील या तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये कोरेगाव भीमा हिंसाचारात लोक कमी पडत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक कार्यकर्ते सुधींद्र कुलकर्णी यांना बिनधास्त कापा, ही माणसे म्हणजे देशाला लागलेली कीड आहे, असे म्हटले होते. अशी पोस्ट टाकणारा पाटील स्वत:ची ओळख शिवसैनिक म्हणून करून देतो. मात्र, तो शिवसैनिक नसून संभाजी भिडे यांचा कट्टर अनुयायी आहे. गुप्त कारवाया करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते खरी ओळख लपवून अशा पोस्ट टाकतात.  त्यातलाच पाटील याचा हा प्रकार असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.  मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना कापण्याची भाषा होत असताना, त्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले नाही. पाटील यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक, शहरचे पोलिस आयुक्त आणि गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.    

 

कोम्बिंग ऑपरेशनला न्यायालयात आव्हान देणार  
पोलिसांनी राज्यभर कोम्बिंग आॅपरेशन राबवले. त्यात तीन हजार आंबेडकरी कार्यकर्ते पकडले गेले. त्यातील १२५ कार्यकर्ते मुंबईतील अाहेत. त्यात १६ अल्पवयीन आहेत. कोम्बिंग आॅपरेशन लष्कर करते. नागरी भागात ते पोलिसांना करता येत नाही, असा दावा करत या कारवाईस आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. वढू बुद्रुकजवळील ५ गावांना छावणीचे स्वरूप आले आहे. गावकऱ्यांना पोलिसांनी असे वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. तसेच कोरेगावात विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांच्या नुकसानीबाबत स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदी कराव्यात, असे आवाहन आंबेडकर यांनी या वेळी केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...