आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या निवडीची किंमत माेजावी लागली: वेंगसरकर;पत्रकार विनायक दळवी यांचा गाैरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा पुरस्कार स्वीकारताना पत्रकार विनायक दळवी. - Divya Marathi
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा पुरस्कार स्वीकारताना पत्रकार विनायक दळवी.

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान यापेक्षा निवड समितीचा अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द खडतर होती. एन. श्रीनिवासन यांच्या चेन्नईचा, चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू बद्रीनाथ याला न निवडता मी विराट कोहलीला निवडले आणि त्या प्रामाणिकपणाची किंमतही तेवढीच मोठी मोजली. संघनिवडीच्या दुसऱ्याच दिवशी एन. श्रीनिवासन श्रीकांतला घेऊन त्या वेळचे बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले आणि त्या दिवशी निवड समितीच्या अध्यक्षपदाची माझी कारकीर्द संपली, असा गौप्यस्फोट भारताचे माजी कप्तान, दिलीप वेंगसरकर यांनी मुंबईत केला.


 मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पत्रकार भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात दै. दिव्य मराठीचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांचा या वेळी महेश बोभाटे स्मृती क्रीडा पत्रकार पुरस्कार, तर युवा पत्रकार म्हणून पुढारीचे क्रीडा पत्रकार संदीप कदम यांचा आत्माराम मोरे स्मृती पुरस्कार देऊन या वेळी गौरव करण्यात आला. दळवी यांना सन्मानचिन्ह आणि १० हजार रु., तर संदीप कदम यांना सन्मानचिन्ह आणि ७ हजार रु. देऊन सन्मानित करण्यात आले.   


वेंगसरकर आणि फारुख इंजिनिअर यांनी अशा अनेक किश्श्यांनी या सोहळ्यात रंगत भरली. सूत्रसंचालक आश्विन बापट यांनी या दोघांनाही बोलते केले. विशेष म्हणजे फारुख इंजिनिअर यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला.  विविध विषयांवर या मान्यवरांनी आपली दिलखुलास मते व्यक्त केली. या वेळी माजी कसोटीपटू सुधीर नाईक, क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, कॅरम संघटक अरुण केदार आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.  अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त केले.  


श्रीलंका दाैऱ्यासाठी निवड  
वेंगसरकर म्हणाले, ऑस्ट्रेलियात  उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे ४ संघ खेळतात. त्यामध्ये आम्ही २३ वर्षांखालील खेळाडूंचा संघ पाठवला. त्या स्पर्धेत विराट कोहलीने अप्रतिम शतक (१२३ नाबाद) झळकावले. त्या वेळी तो परिपक्व व परिपूर्ण क्रिकेटपटू वाटला. म्हणून मी त्याला नंतरच्या श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघात निवडण्याचा प्रस्ताव ठेवला. पण कप्तान धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणत होते, ‘आम्ही कोहलीला पाहिले नाही म्हणून त्याला आताच नको.’ मी त्यांना म्हटले, मी कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिले आहे, तेव्हा याला घेऊया. मला ठाऊक होते, त्यांना चेन्नई सुपरकिंग्जच्या बद्रीनाथची कळकळ होती. कोहलीला घेतल्यास बद्रीनाथ संघाबाहेर जाणार हेही निश्चित होते. मी कोहलीला घेतले. 


काेहली खेळला; मी बाहेर 
बीसीसीआयचे कोशाध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मला विचारले, बद्रीनाथला का बाहेर काढले? त्यांच्याशी माझा वाद झाला. दुसऱ्या दिवशी श्रीनिवासन शरद पवार यांना भेटले आणि माझी निवड समितीवरून गच्छंती झाली. मला एकच गोष्ट त्यातही समाधान देते की, मला निवड समितीवरून बदलले; पण कोहलीला संघात घेण्याचा माझा निर्णय बदलला गेला नाही. माझा निर्णय किती योग्य होता ते काळानेच सिद्ध केले आहे.  


याच चर्चासत्रात फारुख इंजिनिअर यांनी पारसी शैलीच्या मराठीमध्ये १९६०च्या दशकातील क्रिकेटच्या अनेक गोष्टी सांगितल्या. फक्त क्रिकेटच नव्हे, तर त्या काळी आपण कबड्डी (त्या वेळच्या हुतूतूमध्येही) रग जिरवली होती, असेही ते म्हणाले.  

 

कसाेटी सर्वाेत्तम क्रिकेट 
फारुख इंजिनिअर यांनी कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम क्रिकेट असल्याचे सांगितले. सध्या कसोटीपेक्षा आयपीएलकडे खेळाडू अधिक आकर्षित होत असल्याचे खंतही त्यांनी बोलून दाखवली, तर कसोटी क्रिकेट नसेल तर क्रिकेटच मृत्युपंथाला जाईल, असा इशारा वेंगसरकर यांनी दिला. दरम्यान त्यांनी कसाेटी क्रिकेटला चालना मिळावी, असेही या वेळी अावर्जुन सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...