आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनची लीग अडचणीत! प्रस्तावित टी-20 क्रिकेट लीग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रस्तावित टी-२० क्रिकेट लीगमध्ये अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या असून, त्यामुळे आज सहा सहभागी संघांसाठी होणारी खेळाडू लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आली. अध्यक्ष आशिष शेलार सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनात व्यग्र असल्यामुळे मुंबईत आज घेण्यात आलेल्या कार्यकारीणीच्या तातडीच्या बैठकीत, कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 


दरम्यान, आजच्या बैठकीमध्ये या लीगबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करून, त्यामध्ये तांत्रिक अडचणीचे मुद्दे मांडणारे रवी सावंत यांनाही नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. एमसीएचे कायदे सल्लागार आणि सीईओ यांनी कार्यकारिणीला तुम्ही काळजीवाहू समिती नसून नियमित समिती असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ही लीग आयोजित करण्याचा हुरूप एमसीए कार्यकारीणीला मिळाला.


अलीकडेच १० नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर करून नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा करून नंतरच निवडणूक घेण्याचा निर्णय आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीने घेतला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीच्या अधिकृत कार्यकाळाची मुदत एप्रिल महिन्यातच संपली होती. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या समितीचे नेमके स्वरूप काय आहे याबाबत सध्या मुंबई क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

 

पहिल्याच लीगमध्ये अडथळे 
 मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील ही पहिलीच व्यावसायिक व आर्थिक बाबींशी संबंधित लीग असल्यामुळे सरकारी करांचे विळखे आणि लोढा समिती शिफारशी व प्रशासक मंडळाचे मत निर्णायक ठरणार आहे.  असोसिएशनची प्राप्तिकर विभाग व अन्य करसंबंधित प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे या व्यावसायिक लीगच्या निमित्ताने घेतले जाणारे अनेक निर्णय एमसीएच्या भवितव्यावरही परिणाम करणारे ठरणार आहेत.

 

निर्णयाविना कामाची सुरुवात 
लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशींचा मान राखून शरद पवार यांनी मुंबई क्रिकेटचे अध्यक्षपद आणि दिलीप वेंगसरकर यांनी उपाध्यक्षपद सोडले होते. मात्र, त्यानंतरही अन्य समिती सदस्य व पदाधिकारी यांनी कोणताही निर्णय न घेता काम सुरू ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...