आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढीचा निर्णय नाहीच; अाता मुंबईला रेल्वेने दूध; दूधटंचाई भासू नये म्हणून सरकारची जय्यत तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिधाेरे (ता. माढा) येथे अांदाेलनकर्त्यांनी नॅचरल डेअरीची वाहने अडवून पाकिटांची नासधूस केली. - Divya Marathi
रिधाेरे (ता. माढा) येथे अांदाेलनकर्त्यांनी नॅचरल डेअरीची वाहने अडवून पाकिटांची नासधूस केली.

मुंबई- दरवाढीच्या मागणीसाठी मुंबईचा दूधपुरवठा राेखण्याचा चंग बांधलेले  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी मंगळवारी स्वत: ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले हाेते. गुजरातमधून मुंबईत येणारे दुधाचे २२ टँकर शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीमेवरील अच्छाड नाक्यावर अडवून परत पाठवले. 


दरम्यान, मुंबईकरांना दूधटंचाई भासू नये म्हणून सरकारनेही जय्यत तयारी केली अाहे. त्यानुसार रेल्वेच्या माध्यमातून बुधवारपासून गुजरातमधून प्रतिदिन १२ वाघिण्यांद्वारे दूध मुंबईत आणण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन दूध दराबाबत चर्चा केली, मात्र त्यावर ताेडगा निघू शकला नाही. अाता बुधवारी पुन्हा बैठक हाेणार अाहे.


मुंबईला मुख्यत्वे कोल्हापूरचे गोकुळ व गुजरातमधील अमूल या ब्रँडच्या दुधाचा पुरवठा होता. मुंबईला होणारा दूधपुरवठा तोडण्यासाठी आंदोलनाचे नेते राजू शेट्टी मैदानात उतरले होते. मुंबई -अहमदाबाद या आठ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील अाच्छाड या सीमा तपासणी नाक्यावर त्यांनी दिवसभर तळ ठोकला होता. हा नाका गुजरात सीमेवर तलासरी (जि. ठाणे ) तालुक्यात आहे. शेट्टी यांनी गुजरातमधून दूध आणणारे २२ टँकर्स येथे अडवले. मात्र दुधाची शेट्टी आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली नाही. अडवलेले सर्व टँकर्स त्यांनी परत पाेलिस बंदाेबस्तात गुजरातला पाठवले. दरम्यान, ‘गोकुळ’ने शेट्टींच्या दूध आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुंबईत मंगळवारी गोकुळ दुधाचे  केवळ १२ टँकर्स पोहोचले, तेसुद्धा पोलिसांच्या सुरक्षेत.  


पश्चिम रेल्वे मदतीला
गुजरातच्या आणंद येथून रोज दुधाच्या दोन वाघिण्या (टँकर्स) मुंबईत येतात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून अहमदाबाद -मुंबई पॅसेंजरला अाणखी १० वाघिण्या जोडल्या जाणार आहेत. एका वाघिणीत ४४ हजार लिटर्स दुध असते. गुजरामधून अतिरिक्त दूध रेल्वेने आणण्यासाठी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी तातडीने सूत्रे हलवून पश्चिम रेल्वेला आदेश दिले अाहेत.

 

मराठवाड्यात दुुसऱ्या दिवशीही अांदाेलनाचे पडसाद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘दूध बंद’ची धार दुसऱ्या दिवशीही मराठवाड्यात कायम हाेती. बीड तालुक्यातील पाली येथे  एक टँकर अडवून त्यातील दुध रस्त्यावर साेडून देण्यात अाले. तर  येरमाळ्यात (जि. उस्मानाबाद) दूध वाहतूक करणारी व्हॅन जाळण्यात आली. जालना जिल्ह्यातून बुलडाण्याकडे नेण्यात येणारे दुधाचे टँकर कार्यकर्त्यांनी विदर्भाच्या सीमेवर अडवून त्यातील दुधाची नासधूस केली.

 

विधिमंडळात प्रदीर्घ चर्चा, मात्र ताेडगा नाही

दुधाच्या वाढीव दराच्या प्रश्नावर विराेधी पक्षाच्या अामदारांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत सरकारला जाब विचारला. सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान का देत नाही? असा प्रश्न विचारुन गाेंधळ घातला. मात्र राज्यातील ६० % हून अधिक दुध खासगी संघ खरेदी करत असल्यामुळे थेट अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा हाेणार नसल्याचे सांगत सरकारने विराेधकांची मागणी फेटाळून लावली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर पक्षांचे गटनेते यांच्यात या विषयावर बैठकही झाली, मात्र ठाेस निर्णय हाेऊ शकला नाही. दरम्यान, राजू शेट्टींशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, राज्‍यात दुधदरवाढीसाठीच्‍या आंदोलनात गाड्या अडवून रस्‍त्‍यावर दूध फेकण्‍यात आले...

 

बातम्या आणखी आहेत...