आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा: राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाणांच्या नावाची घोषणा, भाजप व काँग्रेसमधून कोण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय पुण्यातील वंदना चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. - Divya Marathi
राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय पुण्यातील वंदना चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली.

मुंबई- पुढील महिन्यात होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी केली. याआधी शिवसेनेकडून अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. दरम्यान, काँग्रेस व भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.

 

एप्रिल महिन्यात रिक्त होणा-या राज्यसभेच्या 58 जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे तर शिवसेना-भाजपच्या एका-एका जागेचा समावेश आहे. मात्र, सध्या विधानसभेतील सदस्य संख्येनुसार भाजपला तीन तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक मिळू शकते. शिवसेनेकडून अनिल देसाई तर राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांना डबल टर्म मिळणार आहे. मात्र, काँग्रेसच्या एका जागेसाठी चार-पाच जण इच्छुक आहेत तर भाजपमधूनही तीन जागांसाठी अनेक जण इच्छुक आहेत.

 

महाराष्ट्रातून रिक्त होत असलेल्या सदस्यांमध्ये रजनी पाटील (काँग्रेस), राजीव शुक्ला (काँग्रेस) वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) डी पी त्रिपाठी (राष्ट्रवादी), अनिल देसाई ( शिवसेना) आणि अजय संचेती (भाजप) आदींचा समावेश आहे.

 

अनिल देसाई- वंदना चव्हाण यांनाच संधी

 

शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. एक जागा जिंकण्यासाठी 42 मते आवश्यक आहेत. त्यासाठी अनिल देसाईंना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा जिंकून किमान 20 मते शिल्लक राहतात. मात्र, या 20 मतांची गरज इतर पक्षानांही नाही. भाजपकडे 135 च्या घरात आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांना तीन जागा निवडून आणण्यासाठी 126 मतांची गरज आहे. जी त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यातील सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय वंदना चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली. राष्ट्रवादीकडे 42 हून अधिक मते आहेत. त्यामुळे भाजपचे तीन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येक एक-एक उमेदवार निवडून येतील. 23 मार्च रोजी होणारी ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे. 

 

काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक-

 

काँग्रेसचे विधानसभेत 43 आमदार आहेत. त्यातील दोघांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेसला केवळ एकच जागा मिळणार आहे. मात्र, या एका जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. यात सुशीलकुमार शिंदे, राजीव शुक्ला, रजनी पाटील, अविनाश पांडे, विलास मुत्तेमवार आदींची नावे चर्चेत आहेत.

 

सुशीलकुमार शिंदे राज्यसभेत जाण्यास इच्छुक आहेत. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मुलगी प्रणितीने लढावे असे त्यांना वाटत आहे. राजीव शुक्ला यांचे नावही काँग्रेस पक्षातून पुढे येऊ शकते. वजनदार व सर्व काही मॅनेज करण्याची ताकद असलेला नेता म्हणून शुक्ला यांचे नाव घेतले जात आहे. दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय रजनी पाटील यांना निष्ठावान व एक महिला म्हणूनही संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. तर दरबारी राजकारणातील अविनाश पांडे यांच्याही नावाची चर्चा आहे. विदर्भातून खासकरून नागपूरातील ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवारांना दिली द्यायची का असाही विचार काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे कळते. टीम राहुलमधील व दिल्ली घडामोडीची जाण असलेले अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही संधी मिळू शकते पण पृथ्वीबाबा फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला 1 जागा मिळणार असली तरी इच्छुकांची संख्या कमी नाही हे दिसून येते.

 

भाजपात इच्छुकांची संख्या भरपूर पण मोदी-शहा म्हणतील त्यांनाच संधी-

 

काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही अनेक नेते इच्छुक आहेत पण त्याबाबत कोणीही काहीही बोलताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे मोदी-शहा ठरवतील त्याच नेत्यांना संधी मिळणार हे भाजपमधील मंडळींना माहित आहे. त्यामुळे कोणीही खुलून बोलताना दिसत नाही. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुदत संपत आहे. त्यामुळे ते गृहराज्य महाराष्ट्रातून पुढील सहा वर्षासाठी राज्यसभेत जाणे पसंत करतील. मोदींनी त्यांच्यावर मनुष्यबळ विकास सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयावर वर्णी लावल्याने त्यांची जागा पक्की मानली जात आहे. उर्वरित दोन जागांसाठी अजय संचेती किंवा शायना एनसीसह मुंबईतून एखादे आर्थिक रसद पुरविणारे नाव पुढे येऊ शकते. पण गडकरींचे निकटवर्तीय अजय संचेतींना मोदी-शहा-फडणवीस हे त्रिकुट पुन्हा संधी देईल का याची चर्चा सुरू आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...