आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य माहिती अायुक्तपद बनले निवृत्त सचिवांचे ‘अाश्रयस्थान’!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे पद सध्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव पदावरील व्यक्तींसाठी निवृत्तीनंतरचे ‘आश्रयस्थान’ बनले आहे. निवृत्तीनंतर वयाच्या ६५ वर्षांपर्यंत माहिती आयुक्तपदी किंवा त्यालाच समकक्ष असलेल्या एखाद्या घटनात्मक पदावर नियुक्ती करून घेत निवृत्तीनंतरच्या सर्व लाभांसह सुखेनैव अधिकारपद गाजवण्याचा नवा पायंडाच जणू राज्यात पडला आहे. गेल्या पंधरा वर्षांत एखादा अपवाद वगळता राज्याच्या जवळपास सर्वच मुख्य सचिवांनी निवृत्तीनंतर अशी घटनात्मक पदे भूषवली आहेत.   


महिनाभरापूर्वी माजी मुख्य सचिव सुमित मलिक निवृत्त झाले, मात्र निवृत्त होण्यापूर्वी साधारण ५-७ महिन्यांपासूनच त्यांच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्तीची चर्चा रंगली होती. किंबहुना त्यांच्या नियुक्तीसाठीच हे पद रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती. विशेष म्हणजे मलिक यांनी मुख्य सचिव पदाची सूत्रे ज्या  स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून स्वीकारली होती, त्या क्षत्रिय यांनाही निवृत्तीनंतर अवघ्या काही तासातच सेवा हमी कायदा आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले होते.  

 

अशी नियुक्ती करणे चुकीचीच : सिंग  
माजी आयपीएस अधिकारी वाय.पी. सिंग म्हणाले की, अशा पद्धतीने सरसकट प्रत्येक मुख्य सचिव किंवा निवृत्त अधिकाऱ्याला घटनात्मक पदी नियुक्त करणे चुकीचे आहे. त्याऐवजी अशा पदांवर नियुक्त्यांसाठी एक खुली निवड व्यवस्था असावी. ज्या पदावर नियुक्ती करावयाची आहे, त्याची जाहिरात देऊन अर्ज मागवले जावेत आणि त्यानुसार खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने निवड केली जावी, असे ते म्हणाले.

 

या अधिकाऱ्यांनी घेतला लाभ  
मलिक किंवा क्षत्रिय यांच्याप्रमाणेच यापूर्वीही अनेक मुख्य सचिवांनी अशा पद्धतीने घटनात्मक पदी आपली वर्णी लावून घेतली आहे. जॉनी जोसेफ यांची लोकायुक्तपदी आणि त्यानंतर पर्यावरण समिती सदस्यपदी, जे.पी. डांगे यांची वित्त आयोग सदस्यपदी, रत्नाकर गायकवाड यांची मुख्य माहिती अायुक्तपदी, जयंत बांठिया यांची सिकॉमच्या अध्यक्षपदी, जे.एस सहारिया यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली.  अाघाडी सरकारच्या काळातही पी. सुब्रमण्यम, व्ही.रंगनाथन, अरुण बोंगीरवार आणि द.म. सुखठणकर यासारख्या माजी मुख्य सचिवांनीही निवृत्तीनंतर विविध समित्यांवरील सल्लागारांची किंवा अनेक घटनात्मक पदे भूषवली आहेत.  

बातम्या आणखी आहेत...