Home | Maharashtra | Mumbai | sanjay raut takes interview of cm fadnavis

कथित सेक्युलरवादी एकत्र अाल्यास युती करावीच लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2018, 03:37 AM IST

शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढण्याची घाेषणा केली असली तरी भाजपला मात्र युतीची अाशा अाहे.

 • sanjay raut takes interview of cm fadnavis

  मुंबई - शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढण्याची घाेषणा केली असली तरी भाजपला मात्र युतीची अाशा अाहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही नुकतेच जाहीरपणे तसे संकेत दिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंगळवारी ताेच पुनरुच्चार केला. ‘देशातील कथित सेक्युलर लाेक एकत्र हाेत अाहेत. अशा वेळी सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना एकत्र येण्यास परिस्थितीच भाग पाडेल,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.


  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत एका कार्यक्रमात फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी राऊतांच्या विविध प्रश्नांवर कधी मिश्किलपणे तर कधी टाेलेबाजी करून उत्तरे दिली. ‘२०१४ मध्ये युती का तुटली?’ या प्रश्नावर ‘तेव्हा शिवसेनेला १५१ जागा हव्या होत्या, आम्ही १४७ द्यायला तयार होताे. युती झाली असती तर बहुमत मिळाले असते तर उद्धव ठाकरे किंवा तुम्हीही (राऊत) मुख्यमंत्री झाला असता,’ असा टाेला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
  ‘निवडणुकीच्या ताेंडावर भाजपत गुन्हेगार अाले. तुम्हाला हे पटतं का?’ या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘भाजपमध्ये फार गुन्हेगार आले असं मला वाटत नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबले पाहिजे यासाठी प्रत्येक पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे अाहे. जशी राजकीय पक्षाची जबाबदारी तशी जनतेचीही जबाबदारी अाहे. अापण मत काेणाला देताेय याबाबत जनतेने ठरवले तर गुन्हेगार निवडून येऊच शकणार नाहीत.’


  बाळासाहेबांचा ‘रिमाेट’ अावडला असता
  ‘सरकारवर रिमाेट कंट्राेल नाही. मोदी किंवा अमित शहा यांनी कधीही हे करा किंवा करुन का असे सांगत नाहीत. केंद्राच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचाच आग्रह असतो. उगाच नसत्या घाेषणा नकाेत, हे मोदी सांगतात. मात्र बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्याकडे ‘रिमाेट’ द्यायला अावडला असता,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.


  ‘युती झाल्यास भाजपची साथ साेडणार असल्याचे नारायण राणेंनी सांगितले अाहे?’ या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘राणेंची मुलाखत मी एेकली नाही. मात्र तुम्ही (शिवसेना) सवतीसारखे वागलात म्हणून त्यांना (राणेंना) जवळ करावे लागले. तुम्ही तसे वागले नसता तर अाम्ही त्यांना जवळच केले नसते.’

Trending