आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहा जसे माधुरीला भेटले तसेच उद्धवनाही भेटले : खासदार राजू शेट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष अमित शहा महासंपर्क अभियानाचा भाग म्हणून जसे अभिनेत्री माधुरी दीक्षितला भेटले त्याच धर्तीवर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील भेटले. पण ‘मातोश्री’वरील या भेटीने त्यांच्यातील कटुता संपेल असे आपल्याला वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे आपला मूळ स्वभाव सोडण्याची सूतराम शक्यता नाही, अशा शब्दांत  शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या जुन्या मित्रपक्षांची खिल्ली उडवली.   


राजू शेट्टी गुरुवारी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेला उभ्या असलेल्या जनता दल युनायटेडच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या वेळी शेट्टी यांनी केले. तुम्हाला शहा भेटायला आले नाहीत, असा सवाल शेट्टी यांना विचारला असता ‘मी लहान माणूस आहे. पण जर का मला भेटायला शहा आले असते तर मी लतादीदीप्रमाणे अचानक आजारी पडलो असतो,’ असे ते गमतीने म्हणाले.   


मोदी सरकारने साडेआठ हजार कोटींचे पॅकेज ऊस शेतकऱ्यांना दिले आहे. त्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, या पॅकेजची अंमलबजावणी कशी होणार, केंद्र साखर निर्यातीला अनुदान देणार का, यासंदर्भात अद्यापही संभ्रम असल्याचे ते म्हणाले. यंदा मान्सून चांगला आहे, पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आपण राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपात सहभाग झालाे नाही. मात्र, संपाला आपला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.

 

  पुढच्या लोकसभेला यूपीए की एनडीए जिंकणार, यात शेतकरी संघटनेला स्वारस्य नाही. शेतकऱ्यांचा दबावगट कायम राहावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे सोपे जाईल, यासाठी आपला प्रयत्न असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.  


रासायनिक खतावर बंदीने कृषी उत्पादन घटेल 

रासायनिक खतांवर बंदी आणण्याच्या राज्य सरकार वल्गना करत आहे. पण तसे केल्यास कृषी उत्पादनात कमालीची घट येईल. त्यामुळे शेतकरी आणि जनताही उपाशी मरेल. शेती समस्या सोडवण्यासाठी संसदेचे स्वतंत्र अधिवेशन घेण्यासाठी साडेतीन हजार गावांचे ठराव आणि एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन आम्ही राष्ट्रपतींना दिले. पण मोदी यांनी आजपर्यंत ती मागणी मान्य केली नाही.

 

शहांना "ढोकळा’ खाऊ घालून महाराष्ट्राचा अपमान : काँग्रेस

"मातोश्री’वर अमित शहांना गुजराती ढोकळा, खांडवी आणि गठिया हे गुजराती व्यंजन  खाऊ घालून शिवसेनेने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. अमित शहा यांनी संपूर्ण देशाला फसवल्यामुळे त्यांना शिवसेनेने ढोकळ्याऐवजी मसालेदार वडा खाऊ घालायला हवे होते, अशा शब्दांत काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी आपल्याला घरासमोर पोलिसांची तैनाती करून आपल्याला स्थानबद्ध करण्यात आले होते, असा आरोप मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...