आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला शह अन‌् काेकणचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी शिवसेनेची ‘नाणार’द्वारे धडपड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री नाणारकरांच्या बाजूने उभे राहणार की शहा, मोदी आणि सिंघवी यांच्यासारख्या दलालांच्या मागे उभे राहणार, असा तिखट सवाल करत शिवसेनेने भाजपला नाणार प्रकल्प रद्द करण्याचे उघड आव्हान दिले आहे. नाणार प्रकल्पावरून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेली विधाने पाहता नाणारचा मुद्दा या दोन्ही पक्षांच्या राजकीय साठमारीचे नवे रणांगण असणार आहे. शिवसेनेसाठी नाणार प्रकल्पाच्या विरोधाचा मुद्दा का महत्त्वाचा आहे, त्यामागील कारणांचा घेतलेला हा वेध.  


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती शक्य नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेने युतीची शक्यता सध्या तरी फेटाळून लावली आहे. एकेकाळी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेला भाजपची राजकीय ताकद वाढल्याने सध्या युतीतील लहान भावाची भूमिका वठवावी लागत आहे. पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभाग आणि सरकारच्या एखाद्या निर्णयावरून जनक्षोभ उसळण्याचा अंदाज आल्यावर आपल्याच सरकारला विरोध असे दुटप्पी धोरण सध्या शिवसेनेने स्वीकारले आहे. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरूनही हीच बाब प्रकर्षाने समोर आली आहे. नाणारच्या मुद्द्यावरून भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत असल्याचे लक्षात येताच प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे राहत शिवसेनेने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 

एक म्हणजे हा प्रकल्प भाजप रेटत असल्याचे भासवून आपण स्थानिक जनतेसोबत असल्याचे चित्र निर्माण करणे आणि मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा राणेंसारख्या विरोधकांना या प्रकल्पाच्या विरोधाचे श्रेय मिळू न देणे, असा दुहेरी प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. शिवाय अलीकडे आपल्याला किंमत देत नसलेल्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला या प्रकल्पाच्या निमित्ताने नाकदुऱ्या काढायला लावणे हादेखील शिवसेनेचा एक छुपा हेतू आहेच. त्यातच नाणारबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेला आणखी एक किनार आहे, ती म्हणजे कोकणातील राजकीय पुनरागमनाची. एकेकाळी काेकणात प्रबळ असलेली शिवसेना राणेंनी पक्ष सोडल्यानंतर दुबळी झाली. २०१४ च्या मोदी लाटेत शिवसेनेने राणे पितापुत्रांचा पराभव करत काेकणात पुन्हा एकदा बस्तान बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून जनमत विरोधात जाऊ नये, याची काळजी घेणे शिवसेनेला क्रमप्राप्त आहे.


एकूणच नाणार प्रकल्पग्रस्तांचा रेटा आपल्या राजकीय लाभासाठी वापरून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असला तरीही भाजप नाणारच्या मुद्द्यावर काय भूमिका घेते यावर सेनेचा हेतू कितपत साध्य होईल, ते ठरणार आहे.

 

वाढीव मोबदल्याचा प्रश्नच नाही, हा प्रकल्पच विनाशकारी

नाणार प्रकल्प हा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. १६ हजार एकर जमीन यात जाणार आहे. त्या प्रकल्पातून कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजनसारखे घातक वायू उत्सर्जित होणार. विषारी उपपदार्थ येथील समुद्रात सोडणार. या प्रकल्पाने इथली आंबा, फणस, काजू, माडाची पारंपरिक शेती कायमची नष्ट होणार आहे. हा परिसर आंब्याचे आगर आहे. सव्वा लाख परप्रांतीयांना इथल्या बागांमध्ये राेजगार मिळतो आहे. आम्ही सुखाने जगतोय. ते गमावून विस्थापित व्हायचे? भूसंपादनाचा किती मोबदला द्याल?  एकरी पाच कोटी दिले तरी आम्ही तो स्वीकारणार नाही. कारण हा विनाशकारी प्रकल्प आम्हाला नको आहे. कोकणाच्या मुळावर उठलेला आहे, म्हणून!  
- अशोक वालम (अध्यक्ष, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती, नाणार)

बातम्या आणखी आहेत...