आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठ आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. ३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. तसेच सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस नाव देण्याचाही प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.   


मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींसमवेत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस धनगर समाज विकास परिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदींसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडेंनी त्यांचे अभिनंदन केले. नामविस्तारासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आल्याचे तावडे म्हणाले. 

 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून पुढील कार्यवाहीबाबत अंमलबजावणी करण्यात येईल. याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजातील तरुण- तरुणींना उद्योग सुरू करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास दरवर्षी १० कोटी रुपये देणे, विविध विद्यापीठांत महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे; जेणेकरून तेथे बसवेश्वरांची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येतील, असेही ते या वेळी म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...