आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ मार्गासाठी दक्षिण कोरियाचा हात आखडता;26 हजार कोटींची घाेषणा, प्रत्यक्षात 2.5 हजार काेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापुढील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या महामार्गासाठी पैसा उभारणे ही मोठी समस्या मुख्यमंत्र्यांपुढे आहे. यासाठी दक्षिण कोरियाकडून सुमारे २६ हजार कोटी रुपयांची मदत मिळणार होती. परंतु, कोरियाने आता फक्त २.५ ते ३ हजार कोटीच देऊ केले आहेत. मात्र, समृद्धी महामार्गासाठी पैसा कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’कडे स्पष्ट केले.   

 
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी दक्षिण कोरिया २६ हजार कोटी रुपये देईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी आता फक्त अडीच ते तीन हजार कोटीच रुपये देण्याची इच्छा दर्शवली आहे. ही अत्यंत तुटपुंजी मदत असून त्यांनी या प्रकल्पातील किमान चार प्रकल्पांना मदत करावी, असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या चार प्रकल्पांनाही ५-६ हजार कोटीच मिळणार आहेत. 


त्यातही, दक्षिण कोरियाने या प्रस्तावावर विचार करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी मागून घेतला आहे. त्यांनी ५-६ हजार कोटी िदले तरी त्याचा या कामासाठी तितका फायदा होणार नाही. त्यामुळे पैसे उभारण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध सुरू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. ८४३१ हेक्टरपैकी ३११३ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले असून २ महिन्यांत जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊन मार्चमध्ये प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही सांगण्यात आले.


केवळ परदेशी मदतीवरच अवलंबून नव्हतो - मोपलवार  
दक्षिण कोरियाच्या आर्थिक मदतीवर आमचा प्रकल्प अवलंबून नाही. स्टेट बँकने १४ हजार कोटी रुपये देऊ केले असून तसा करारही करण्यात आला आहे, तर अन्य बँकांकडूनही १४ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. परदेशातून या प्रकल्पाला आर्थिक मदत मिळावी, असा आमचा प्रयत्न होता आणि त्यानुसारच दक्षिण कोरियाकडेही मदत मागितली होती, परंतु परदेशातील अर्थिक मदतीवरच आम्ही अवलंबून नव्हतो. समृद्धी महामार्ग ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल आणि भूसंपादनाचे कामही सुरू असून या महिन्यात जास्तीत जास्त भूसंपादन केले जाईल, असे समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख मोपलवार यांनी स्पष्ट केले.


बँकांचे अर्थसाहाय्य
सीईओे मोपलवार म्हणाले, केवळ परदेशी मदतीवर प्रकल्प अवलंबून नाही. स्टेट बँकने १४ हजार कोटी रुपये देऊ केले असून तसा करारही झाला आहे.  अन्य बँकांकडूनही १४ हजार कोटी मिळणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...