आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या नाही तर, आचार्य अत्रेंच्या कल्पनेतून साकारली शिवसेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 13 जून रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी अत्रेंविषयी माहीती देत आहे. आजघडीला शिवसेनेला वगळून महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाचा विचार करताच येत नाही. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी जरी शिवसेनेची स्‍थापना केली असली, तरी 'शिवसेना' शब्‍द आणि या प्रकारच्‍या संघटनेची कल्‍पना ही आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे यांची होती. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com वाचकांना देत आहे.


संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. २५ जुलै १९५९ या दिवशीच्या‘मराठा’ दैनिकात ‘शिवसेना’याच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे त्यांनी सुचविले होते. 


आचार्य अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर ‘शिवसेना’ हेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले आणि विचार पक्का होताच संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. १९ जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली.


मित्राचे विरोधक झाले प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे...
प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांचे संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीसाठी मोठे योगदान आहे. या दोघांनी एकत्र येऊन संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीसाठी दिवसरात्र एक केला होता. कालांतराने संयुक्त महाराष्ट्र समितीमध्‍ये फूट पडली. आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार यांच्‍यात दुरावा निर्माण झाला. त्‍यानंतर हे दोघेही एकमेकांचे विरोधक म्‍हणून ओळखले जाऊ लागले.


... तर अत्रे असते पहिले शिवसेना प्रमुख
13 जून 1969 रोजी अत्रे यांचे निधन झाले. 22 जून रोजी 'असा पुरुष होणे नाही', या नावाने ठाकरेंनी‘मार्मिक’मध्ये अत्र्यांवर संपादकीय लिहिले. आम्ही वैराची दरी बुजवण्याचे खूप आधीपासून प्रयत्न करत होतो, असं त्यात स्पष्ट करण्यात आले होते. शिवाजी पार्कवरच्या 30 ऑक्टोबर 1966 रोजी झालेल्या पहिल्या विराट मेळाव्यात अत्र्यांना ‘आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभे राहा’, असे जाहीर आवाहन केले होते, असे या अग्रलेखात म्‍हटले होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या प्रत्येक मेळाव्यात या आवाहनाचा पुनरुच्चार करण्यात आला’, असेही ठाकरेंनी नमूद केले होते. पण अत्रे गेले नाहीत. जर ते गेले असतेस, तर अत्रे कदाचित पहिले शिवसेनाप्रमुख झाले असते.

बातम्या आणखी आहेत...