आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- दलित समाजात भाजपबाबत चुकीचा संदेश देण्याचे काम काही तत्त्वे करत आहेत. कोरेगाव भीमा घटना याचेच षडयंत्र होते. कार्यकर्त्यांनी अशा घटना टाळून दलितांत भाजपबाबत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून त्याच्या तयारीला लागण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली आहे.
२६ जानेवारी रोजी आयोजित ‘संविधान बचाव’ रॅलीला “तिरंगा रॅली’ काढून उत्तर देण्याचे या बैठकीत ठरले. मात्र, शिवसेनेबाबत कोणत्याच प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिली. मंगळवारी दादरच्या वसंतस्मृती भाजप कार्यालयात भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीला प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. “दलितांबाबत नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही कार्यक्रमात काहीही बोलू नये. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच दलितांचीही आपण काळजी घेतली पाहिजे. या दंगलीमागे माओवाद्यांचा हात असल्याचे उघड होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरेगाव भीमा हा माओवादी गटाच्या कटाचाच एक भाग होता. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळावी आणि दलित व दलितेतर दंगल व्हावी, असा त्यांचा प्रयत्न होता. दलितांच्या आर्थिक सक्षमतेकरिता राज्य सरकार नवी योजना आणणार असून सहा महिन्यात ही योजना जाहीर केली जाईल,’ असे या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
आपला कार्यकाळ पूर्ण करणार : मुख्यमंत्री
लोकसभा निवडणुका ६ महिने अगोदर होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र, विधानसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होणार नसून आपले सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बूथ सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचना या वेळी कार्यकर्त्यांना दिल्या. मी स्वतः आणि मुख्यमंत्रीही बूथ सक्षम करण्यावर लक्ष देणार असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने एका बूथची जबाबदारी घ्यावी. यासाठी १ बूथ १० कार्यकर्ते ही संकल्पना राबवली पाहिजे. मतदार यादीतील प्रत्येक पानाची जबाबदारी घेऊन त्यानुसार काम केले पाहिजे. २६ जानेवारीला प्रत्येक तालुक्यात तिरंगा रॅली काढून विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर द्यावे, असेही दानवे यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
'संविधान बचाव'ला तिरंगा रॅलीने उत्तर-
भारतीय जनता पक्ष ताकदीचा पक्ष बनला आहे. हे काही लोकांना सहन होत नाहीये. त्यामुळे भाजपला व आपल्या सरकारला बदनाम करण्यासाठी काही मंडळी काम करत आहेत. याचाच भाग म्हणून विरोधक आता संविधान बचावसारखे उद्योग करत आहेत. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून भाजप येत्या 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढेल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.
दानवे म्हणाले, पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काम करण्याबाबत ध्येयधोरणावर आज चर्चा केली. भीमा कोरेगावच्या विषयावर कार्यकर्त्यांना सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या. विरोधकांची हल्लाबोल यात्रा अपयशी ठरली आहे, मात्र त्यांची आगामी काळात वेगवेगळ्या विषयांवर नौटंकी सुरू राहील त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले जाईल असेही दानवे यांनी सांगितले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.