आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या बदल्या अाॅनलाइनच; महिला, अपंग, माजी सैनिकांना मिळणार प्राधान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - जिल्हा परिषद शिक्षकांच्या अाॅनलाइन बदली धोरणाला उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला अाहे. त्यामुळे बदल्यांत राजकीय हस्तक्षेपाला अाळा बसून ही प्रकिया संपूर्णपणे पारदर्शी राबवली जाईल. शिक्षकांवर काेणत्याही अन्याय हाेणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी  शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  


नव्या धोरणानुसार, बरीच वर्षे घरापासून दूर असलेल्या शिक्षकांना आता आपल्या परिसरात येता येणार आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना सुगम भागात येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महिला शिक्षकांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना योग्य असलेल्या ठिकाणी बदलीचा हक्क या धोरणानुसार मिळणार आहे. बदली प्रक्रियेत अपंग महिला, दुर्धर आजार आणि माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नी यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

 

बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करताना शिक्षकांना २० पर्याय द्यावे लागणार आहेत. याच पर्यायांमध्ये शाळेमध्ये शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत विभाग प्रयत्नशील आहे. बदल्यांचे आदेश देण्यासाठी वेळ न लावता ते निश्चित कालावधीत देण्यात यावेत, अशी संघटनांनी मागणी केल्यानंतर जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश मे महिन्यातच देण्याबाबत प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. 

 
संघटनांशी सकारात्मक चर्चा
नव्या जि.प. शिक्षक बदली धोरणाला काही संघटनांनी विरोध केला अाहे. मात्र दुसरीकडे १८ शिक्षक संघटनांनी सरकारच्या नव्या धोरणाला समर्थन दिले अाहे.  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष काळू बोरसे आणि दुर्गम शिक्षक संघटनेचे राहुल शिंदे म्हणाले, शासनाचे  नवे बदली धोरण शिक्षकांच्या फायद्याचेच आहे. यामुळे दुर्गम भागातील महिला शिक्षकांना न्याय मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि सचिव असीम गुप्ता यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या धोरणाविषयी राज्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये असलेला संभ्रम दूर झाल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...