आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचे नवे पर्व: अभियोग्यता चाचणीत पावने दोन लाख उमेदवारांचा सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीमध्ये एक लाख 71 हजार 348 उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या चाचणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्ताकरणाचे नवे पर्व सुरू झाले असून गुणवंत शिक्षकांची निवड होण्यासह शिक्षक निवडीच्या प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. यापुढे ही चाचणी आधार मानून राज्यातील शासकीय, शासन अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीच्या आधारे गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने निश्चित कालावधीत निवड होणार आहे.

 

गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आंतर्बाह्य परिवर्तन घडत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाराष्ट्र शैक्षणिक प्रगत अभियान, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि शाळांचे डिजिटायजेशन यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेत समावेश व्हावा आणि शिक्षक भरतीतील गैरप्रकारांना चाप लागावा यासाठी शासनाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या चाचणीला राज्यातील उमेदवारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

 

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या आधारे राज्यातील 67 केंद्रांवर दररोज तीन प्रमाणे एकूण 30 बॅचेसमध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे. त्यासाठी एक लाख 97 हजार 520 उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर त्यातील एक लाख 71 हजार 348 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. अभियोग्यता चाचणी दिलेले गुणवत्ताधारक उमेदवार राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

 

‘सरल’ (Systematic Administrative Reforms for Achievement in Learning by Students) या संगणकीय प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संचमान्यता करणे सुरू आहे. रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. समायोजनानंतर राज्यातील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची माहिती विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदुनामावलीनुसार वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘पवित्र’ (Pavitra- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

शासनाच्या पवित्र या प्रणालीवर राज्यातील शाळांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून या संकेतस्थळावर प्रत्येक जाहिरात किमान 15 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील. तसेच या भरतीची जाहिरात संबंधित संस्था वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबरोबरच सेवायोजन कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयासही पाठवतील. राज्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांना जाहिरातीतील तपशीलानुसार अभियोग्यता चाचणीमधील गुणांसह ऑनलाईन अर्ज करावे लागतील. गुणानुक्रम, माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदुनामावलीनुसार उमेदवारांची निवडसूची संबंधित संस्थेकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसूचीतील उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठविण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल आणि त्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील.

 

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या 200 गुणांच्या अभियोग्यता चाचणीमध्ये 161 ते 180 गुण मिळविणाऱ्या गटात तीन उमेदवार असून 141 ते 160 गुणांच्या गटात 450 उमेदवार, 121 ते 140 च्या गटात 11 हजार 154 उमेदवार, 101 ते 120 गटात 37 हजार 877 उमेदवार, 81 ते 100 या गटात 62 हजार 982 उमेदवार, 61 ते 80 गुणांच्या गटात 47 हजार 124 उमेदवारांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या एकूण उमेदवारांमध्ये मराठी माध्यमाच्या एक लाख 78 हजार 751, इंग्रजी माध्यमाच्या 10 हजार 992 आणि उर्दु माध्यमाच्या 7 हजार 777 उमेदवारांचा समावेश आहे.

 

अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल-आवड, समायोजन-व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटकांचा समावेश असून बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकांचा समावेश होता.

 

नवीन प्रक्रियेनुसार एका उमेदवारास जास्तीत जास्त पाच वेळा गुण सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. याचाच अर्थ प्रत्येक उमेदवार पाच वेळा चाचणी देऊ शकेल. या चाचणीत मिळालेले गुण भरती प्रक्रियेतील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळांसाठी समान समजण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...