आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर, भंडारा-गाेंदिया पाेटनिवडणूकीत EVM मध्ये बिघाड, भाजपवर सेटिंगचा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडाऱ्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे बिघडल्याच्या तक्रारीनंतर काही वेळातच ती बदलण्यात अाली. - Divya Marathi
भंडाऱ्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे बिघडल्याच्या तक्रारीनंतर काही वेळातच ती बदलण्यात अाली.

मुंबई/ नागपूर - प्रचाराच्या अाखाड्यात राजकीय अाराेप-प्रत्याराेपांनी गाजलेली पालघर व भंडारा-गाेंदिया लाेकसभेची पाेटनिवडणूक साेमवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेतील बिघाडामुळे वादग्रस्त ठरली. पालघर जिल्ह्यात २७६ ठिकाणी तर भंडारा-गाेंदियात सुमारे दाेनशेहून अधिक ठिकाणी मतदान यंत्र बिघडण्याच्या तक्रारी अाल्या, त्यामुळे बराच वेळ मतदान प्रक्रिया ठप्प      झाली हाेती.

 

निवडणूक कर्मचाऱ्यांनी अतिरक्त ईव्हीएम यंत्रे लावून ही प्रक्रिया पूर्ण केली. मात्र या प्रकारामुळे मतदान केंद्रांवर काही वेळ ताटकळत थांबावे लागलेल्या काही मतदारांनी मतदान न करताच काढता पाय घेतला. दरम्यान, सत्ताधारी भाजपवर सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमध्ये घाेळ करण्याचा अाराेप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने दाेन्ही मतदारसंघांत फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र निवडणूक अायाेगाने ती फेटाळली.


उन्हाचा वाढता कडाका, सुट्यांमुळे मतदानाचा टक्का दाेन्ही मतदारसंघांत घसरल्याचे दिसून अाले. पालघरमध्ये अंदाजे ४६.५० टक्के तर भंडारा- गाेंदियात ४२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. मात्र सदाेष ईव्हीएम यंत्रणेमुळे मतदान घटल्याचा अाराेप विराेधकांकडून केला जात अाहे. पालघरमध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला हाेता. सकाळच्या सत्रात मतदानास प्रारंभ झाल्यानंतर काही ठिकाणच्या मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या मतदान केंद्रांवर काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. काही काळानंतर बिघाड झालेल्या यंत्रांऐवजी दुसरी यंत्रे उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु करण्यात आली होती. या दाेन्ही मतदारसंघाची मतमाेजणी ३१ मे राेजी हाेणार अाहे.


मतमाेजणीत व्हीव्हीपॅटच्या स्लीपचीही माेजणी करा  : अशाेक चव्हाण
भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदान केंद्रावर ईव्हीएमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट स्लीपचीही मोजणी करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली.


दीड हजार मतदारांचा बहिष्कार
पालघर जिल्ह्यातील वसई निर्मळ येथील माळी आळी, मावंडा, नवाले, नंदनवन या चार गावांतील सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास दीड हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. या गावातील स्थानिक समस्यांनी नागरिक त्रस्त असून कोणताही राजकीय पक्ष आमच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने आपण मतदानावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.

 

मतटक्का घसरला; फेरमतदानाची काँग्रेस, राष्ट्रवादीची मागणी

दाेन्ही मतदारसंघांत मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले अाहेत. त्यामुळे तिथे फेरमतदान घेण्यात यावे, तोवर मतमोजणी करू नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रवक्ते नवाब मलिक  व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केली.  राज्यात पुरेशा प्रमाणात मतदान यंत्रे असताना सुरतहून का मागवण्यात आली, असा प्रश्न करून पटेल म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाकडे या गंभीर प्रकाराची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अाले. दरम्यान, शिवसेेनेनेही पालघरमधील ईव्हीएम बिघाडप्रकरणी भाजपला लक्ष्य केले. ‘सत्ताधारी भाजपकडे सर्व ईव्हीएमच्या चाव्या व रिमाेट अाहे. त्यामुळेच असे प्रकार घडतात,’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

 

व्हीव्हीपॅटला उष्णतेचा फटका
भंडारा-गाेंदियात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर झाला. मात्र ईव्हीएमप्रमाणे ही यंत्रेही अनेक ठिकाणी बंद पडली. या यंत्रांमध्ये प्रिंटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर उष्णतेमुळे प्रिंटिंग होत नसल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात अाले. मात्र विराेधकांनी ही कारणे मान्य केली नाहीत. भाजपनेच हा घाेळ केल्याचा अाराेप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. सुमारे दीडशे ठिकाणी ही यंत्रे बदलण्यात अाली. पवनी तालुक्यात वलनी येथे सकाळी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यावर सायंकाळपर्यंत पर्यायी यंत्रे पोहोचलेली नव्हती. त्यामुळे येथील सुमारे चारशे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, उत्तर प्रदेशातही ईव्हीएम बिघाड; भाजपकडूनही फेरमतदानाची मागणी...

 

बातम्या आणखी आहेत...