आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची दैनंदिन जमा रोकड बँका स्वतः घेऊन जाणार, दरवर्षी वाचतील 13 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयीकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे महामंडळाचे रोकड हाताळणीसाठी दरवर्षी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी सोलापूर आगारातील १५ लाखांची रोकड बँकेत नेत असताना चोरट्यांनी लांबवली होती.

 

या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेत रोकड भरण्याची जबाबदारी संबंधित बँकेवर सोपविण्याबाबत एसटी प्रशासनाला सूचना केली होती. रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या २८४ व्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  


या वेळी रावते म्हणाले, एसटी महामंडळाच्या २५० आगारात तिकीट विक्रीतून गोळा झालेली रोख रक्कम दररोज बँकेत महामंडळामार्फत जमा केली जाते. दरदिवशी सुमारे १५ कोटी रुपये रोख स्वरूपात विविध आगारात जमा होते. ही रक्कम एसटीच्या बसेसद्वारे जवळच्या स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकेत भरली जाते. मात्र, प्रत्येक आगारातून मोठ्या  प्रमाणात जमा होणाऱ्या रोख रकमेची पुरेशी सुरक्षा व्यवस्था एसटीकडे उपलब्ध नाही. मागणी करूनही अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिस प्रशासनाकडून असमर्थता दाखवली जात असल्याने या रकमेची चोरी होणे, दरोडा पडणे अशा घटना घडत असतात. हे सर्व थांबवण्यासाठी बँकेनेच आगारात येऊन रक्कम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असेही रावते यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

 

एसटीचे दरवर्षी वाचतील १३ कोटी
भारतीय स्टेट बँकेने राज्यातील २५० आगार क्षेत्रातील रोख रक्कम घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ही रक्कम बँकेत जमा करणे, त्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था, बसची व्यवस्था या सर्वावरील खर्चात बचत झाल्याने महामंडळाचे दरवर्षी तब्बल १३ कोटी रुपये वाचणार आहेत, असेही रावते यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...