आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या चौपाटीवर नाट्यपरंपरेचे दर्शन घडवणारे दालन उभारणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 महाकवी कालिदास नाट्यसंकुल, मुलुंड - मराठी रंगभूमीला दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. त्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणारे, नाट्यइतिहास मांडणारे दालन चौपाटीवर उभारण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. नाटक केवळ मनोरंजन नसते, ते जीवनाचा आरसा दाखवत असते. ते काम कलावंत करत असतात, याची कृतज्ञ जाणीव ठेवून आपण सारे मराठी रंगभूमीसाठी एकत्र येऊ, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.   


९८ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या नटरंग या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाट्य परिषदेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर रंगकर्मींसाठी सातत्याने झटणाऱ्या जोशी कुटुंबीयांना वैद्यकीय साह्य म्हणून एक लाख रुपयांचा निधी नाट्य परिषदेने जाहीर केला. नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक यांनी प्रास्ताविक केले. अभिनेते सुबोध भावे यांनी सूत्रसंचालन केले. राज्यातील विविध ठिकाणी नाट्यव्यवस्थापन करणारे, प्रयोगांचे आयोजन करणाऱ्या स्थानिक नाट्यव्यावसायिकांचे विशेष कृतज्ञता  सत्कार या वेळी करण्यात आले.    


उद्धव ठाकरे यांचे आगमन व्यासपीठावर विलंबाने झाले. ते येताच सूत्रसंचालक सुबोध भावेने एक निवेदन वाचून दाखवले. ‘बांद्रा येथील नाट्यगृहात एका प्रयोगासाठी ७५ हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे तेथे मराठी नाटकाचे प्रयोग होऊ शकत नाहीत, याची दखल घेतली जावी,’ असे निवेदनात म्हटले होते.

 

त्याची दखल घेत ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाट्यदालनाची घोषणा केली. शिवाय ‘बालगंधर्व रंगमंदिरासंदर्भात साक्षात बालगंधर्वच सूचना करत असल्याने त्यातही लक्ष घालेन,’ असे ते म्हणाले तेव्हा त्यांच्या समयोचित टिप्पणीचे साऱ्यांनाच कौतुक वाटले. इथे आम्ही सारे राजकीय पक्षांचा मेकअप उतरून रंगभूमीच्या प्रेमासाठी जमलो आहोत, अशी ग्वाहीदेखील ठाकरे यांनी दिली. उत्तम कला अजरामर असते. ती नष्ट होत नाही. त्यामुळे जुनी दर्जेदार नाटके कालबाह्य झाली, असे कुणी म्हणू नये. नाट्य परिषदेचे नवे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडे माणसे जोडण्याची अशी कला आहे, की त्यांना कुठलेही संपर्क अभियान राबवण्याची गरज पडत नाही, असा टोला ठाकरे यांनी स्वागताध्यक्ष विनाेद तावडे यांच्याकडे पाहत मारला.   


कलाकार आणि रसिकत्वाचे नाते सुशीलकुमार शिंदे यांनी उलगडले. ‘कलाकाराला रसिकांची दाद हवी असते. रसिकता नसेल तर कलाकार संपून जाईल आणि कलेचे अस्तित्वच नाहीसे होईल. रसिकता घडवणे आणि कलावंत रसिकतेतून जपणे गरजेचे आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ‘मराठी रंगभूमी अधिक सशक्त करण्यासाठी ग्रामीण भागात नाट्यगृहे उभारली पाहिजेत. लोककलांचा जागर होत राहिला पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  


पुन्हा अामचेच सरकार, शिवसेनेच्या पाठिंब्यावर : तावडे  
९८ व्या नाट्यसंमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. शंभराव्या संमेलनातही मीच असेेन कारण पुढील वर्षीच्या निवडणुकीत पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वास मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अर्थात शिवसेनेच्या पाठिंब्यावरच हे घडून येईल, अशी पुस्तीही तावडे यांनी जोडताच उद्धव ठाकरे यांच्यासह सारेच हास्यकल्लोळात सामील झाले.   

बातम्या आणखी आहेत...