आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएससी, आयसीएससी शाळांत मराठी सक्तीचा राज्य सरकारचा विचार;विनोद तावडेंचे उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सीबीएससी आणि आयसीएससी या केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा आहे, तिथे दहावीपर्यंत मराठी सक्तीची करावी, याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंदर्भात अभ्यास मंडळाला सूचना करणार असल्याचे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.  


मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, भाषेच्या विकास प्रक्रियेला चालना देणारा ठराव विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी मांडला. यावर चर्चा करताना सर्वपक्षीय सदस्यांनी मराठी भाषेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. ‘आयसीएससीच्या शाळांतून मराठी हद्दपार करण्यात आली आहे. मराठी भाषेची द्वितीय भाषा मान्यता काढून घेण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. त्यावर उत्तर देताना तावडे यांनी केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे सांगितले.  


राज्यात आज मराठीचा गौरव दिन साजरा होत असताना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शिवाजीवाडी येथील ११ मुलांची प्राथमिक शाळा बंद होणे ही दुर्दैवाची बाब असल्याचेही कपिल पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्यावर उत्तर देताना तावडे यांनी अशा पद्धतीने कोणतीही शाळा बंद झालेली नसल्याचे सांगितले. या शाळेतील १३०० पैकी ३४४ शाळांमधील मुले दुसऱ्या शाळेत गेली आहेत. त्यांचे शिक्षण बंद झालेले नाही. मात्र तिथे डांबरी रस्ते नाहीत, ओढा  नाले अाहेत. अशा समस्या असल्यास मुख्याध्यापकांनी त्याबाबतचा अहवाल तातडीने पाठवावा. त्यावर विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे अाश्वासन तावडे यांनी दिले.  


मराठी भाषा सल्लागार समितीला सक्रिय करण्यासाठी तिची पुनर्रचना करण्याची आणि आर्थिक तरतूद करण्याची मागणी शिवसेनेच्या डाॅ.नीलम गाेऱ्हे यांनी केली. ‘ भविष्यात मराठीला मजबूत करण्यासाठी सरकारने काय पावले उचलावीत, यावर सभागृहात चर्चा व्हावी आणि निर्णय व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  


नंबर प्लेटसाठी मराठीची सक्ती करा

दरेकर   भाजपचे  प्रवीण दरेकर यांनी राज्यातील सर्व माेटारगाड्यांवरील नंबर प्लेट मराठी करण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली.

 

मराठी ज्ञानभाषा व्हावी, परिषदेत एकमुखी ठराव 
मराठी भाषा ही जास्तीत जास्त लाेकाभिमुख हाेऊन ती ज्ञानभाषा व्हावी याकरिता शासनाने मराठी भाषा विकास प्रक्रियेला अधिक चालना द्यावी, असा एकमुखी ठराव विधान परिषदेत मंजूर करण्यात अाला. मराठीमधील विविध मान्यवर साहित्यिकांनी तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अापापल्या स्तरावर प्रयत्न करून मराठी भाषेच्या संंवर्धनासाठी अविरतपणे याेगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांचे मन:पूर्वक अभिनंदन ठरावाद्वारे करण्यात अाले.  

 

बातम्या आणखी आहेत...