आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद; सेन्सेक्समध्ये २७३, निफ्टीत ९८ अंकांची घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेली वाढ, अमेरिका तसेच चीनदरम्यान वाढत असलेल्या व्यापारी युद्धाचा धोका आणि जून एफअँडओची एक्स्पायरी या सर्व कारणांमुळे बुधवारी झालेल्या व्यवहारावर दबाव दिसून आला. त्यामुळे व्यवहाराच्या अखेरीस मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स २७३ अंकांच्या घसरणीसह तीन आठवड्यांच्या नीचांकी ३५,२१७ या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ९८ अंकांच्या घसरणीसह १०,६७१ या पातळीवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी आणि रुपया कमजोर होत असल्यामुळे चारही बाजूंनी झालेल्या विक्रीच्या माऱ्यात बाजारात घसरण दिसून आली. 


व्यवहारादरम्यान वरच्या पातळीवरून सेन्सेक्समध्ये ४६४.६४ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर निफ्टी १,६५० या पातळीवर घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रांचा विचार केल्यास केवळ आयटी आणि औषधी क्षेत्रामध्ये तेजी नोंदवण्यात आली. याआधी दिवसाच्या व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ३५,६१८.८५ या पातळीपर्यंत मजल मारली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीनंतर लगेच घसरण आली. अखेरीस सेन्सेक्स ३५,२१७.११ या पातळीवर बंद झाला. सहा जूननंतर सेन्सेक्सची ही नीचांकी पातळी आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ३५,१७८.८८ या पातळीवर बंद झाला होता. 


आयटी, औषधी सोडल्यास सर्व निर्देशांक लाल निशाणीवर 
राष्ट्रीय शेअर बाजारातील आयटी आणि औषधी क्षेत्र सोडल्यास उर्वरित सर्व निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले. रुपयातील कमजोरीमुळे निफ्टी आयटी निर्देशांकात ०.५८ टक्के तर औषधी क्षेत्रातील निर्देशांकांत ०.१७ टक्क्यांची मजबुती दिसून आली. तर सर्वाधिक २.४३ टक्क्यांची घसरण सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्देशांकात नोंदवण्यात आली. याव्यतिरिक्त बँक निफ्टीमध्ये ०.६७ टक्के, वाहन क्षेत्रामध्ये १.२५ टक्के, एफएमसीजी निर्देशांकात ०.५८ टक्के, रिअॅल्टी निर्देशांकात १.७९ टक्के, मेटल निर्देशांकात १.२६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...