आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCP संख्याबळ घटल्यास धनंजय मुुंडेंचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादीने नाशिकची जागा गमावली असून परभणी- हिंगाेलीच्या बदल्यात घेतलेल्या लातूर- बीड- उस्मानाबाद मतदारसंघातही पक्षाचा उमेदवार अडचणीत असल्याची चिन्हे अाहेत.

 

त्यातच निरंजन डावखरे यांचा आमदारकीचा राजीनामा यामुळे विधान परिषदेतील सर्वाधिक २३ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या आता २१ वर       अाली आहे, तर शिवसेनेचे संख्याबळ ९ वरून ११ वर पोहोचले आहे. जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अाणखी चार जागांची निवडणूक होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटल्यास या पक्षाचे वरिष्ठ सभागृहातील विराेधी पक्षनेतेपद धाेक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत मित्रपक्ष काँग्रेसकडूनच आव्हान दिले जाऊ शकते. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.  


विधान परिषद सभागृहात ७८ सदस्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ आमदार होते. त्यातील जयंतराव जाधव, सुनील तटकरे, बाबाजानी दुर्रानी हे तिघे निवृत्त झाले. त्यातील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या २१ झाली आहे. त्यातच कोकण पदवीधरचे राष्ट्रवादीचे निरंजन तटकरे यांनी परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ २० वर आले आहे. जुलै महिन्यात परिषदेचे चार सदस्य निवृत्त होत आहेत.

 

त्यातील निरंजन डावखरे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने हा मतदारसंघ गमावल्यास त्यांचे संख्याबळ १९ वर येईल. विधानसभा सदस्यांतून निवडून द्यायच्या सदस्यांत संख्याबळानुसार जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच सदस्य निवडून येऊ शकेल. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीचे १८ आमदार उरतील.  


सध्या काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ १९ होते. लातूर-बीड-उस्मानाबाद येथून काँग्रेसचा उमेदवार निवृत्त झाला. परिणामी ही संख्या १८ झाली. अशा स्थितीत सभापती व विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहण्याची शक्यता नाही. काँग्रेसला परिषदेचे उपसभापती दिलेले आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या सहमतीद्वारे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय ठरू शकतो. अशा परिस्थितीत विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे पद अस्थिर होण्याची शक्यता आहे. 

 

लातूरच्या जागेकडे लक्ष
आजच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि अमरावती या दोन जागा भाजपच्या होत्या. त्या त्यांनी कायम राखल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला तीनपैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची  एकमेव जागा राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीने आज दोन जागा गमावल्या. शिवसेनेला या निवडणुकीत सर्वाधिक लाभ झाला. परभणी-हिंगोली आणि नाशिक अशा राष्ट्रवादीच्या दोन जागा शिवसेनेने खेचून आणल्या. लातूरमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा होता. या जागेची मतमोजणी बाकी आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...