आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे नवे निकष : पेरणी ७५% पेक्षा कमी असेल तर गंभीर दुष्काळ; आधी होता ५०%चा निकष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्काळाची व्याप्ती व नुकसान लक्षात घेऊन केंद्राच्या निर्णयानुसार राज्य सरकारने नवे निकष गुरुवारी जाहीर केले. आता खरीप हंगामात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झालेली असल्यास गंभीर दुष्काळ जाहीर केला जाईल. यापूर्वी हे प्रमाण ५०% होते. जमिनीच्या आर्द्रतेचे प्रमाणही ० ते २५ वरून ० ते ५० केले आहे. त्यामुळे दुष्काळ पडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे शक्य होणार आहे. 


पूर्वी दुष्काळ जाहीर करण्यासाठी गावातील पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करा, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले जात असे. जिल्हाधिकारी अहवाल सादर करत. परंतु आता दुष्काळाचे निकष पूर्ण होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी आदेशाची वाट पाहू नये, असे स्पष्ट केले आहे. मात्र, हे सर्वेक्षण हंगामातील पिकाची कापणी होण्यापूर्वी करावे लागणार आहे. 


यातही बदल : वनस्पती स्थिती निर्देशांकाच्या सूत्रानुसार ६० ते १०० टक्के वनस्पती स्थिती निर्देशांक असेल तर ती सामान्य मानली जाणार आहे. ० ते ४० टक्के असेल तर गंभीर मानली जाईल. मागील वर्षी ० ते २० टक्के स्थिती म्हणजे अतिशय वाईट मानली जात होती. 


नवीन निकष असे 
आॅगस्टअखेर खरिपात प्रत्यक्ष पेरणी क्षेत्राचे सामान्य क्षेत्राशी प्रमाण ८५% वा त्याहून कमी असल्यास मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला जाईल. ७५% पेक्षा कमी पेरणी झाल्यास गंभीर दुष्काळ समजला जाईल. पूर्वी दुष्काळी परिस्थितीसाठी ही मर्यादा ३३.३% पेक्षा कमी होती व ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी असल्यास गंभीर दुष्काळ सूचित करण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...