आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पसंतीक्रमानुसार, पोलिस विभागाला निर्णय लागू नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारच्या सेवेतील द्वितीय श्रेणी अधिकारी तसेच तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली करताना यापुढे त्यांचा पसंतीक्रम विचारला जाणार आहे. त्यामुळे इच्छित ठिकाणच्या बदलीसाठी किंवा झालेली बदली रद्द करण्यासाठी यापुढे मंत्र्यांच्या शिफारशीसाठी प्रयत्न करण्याच्या कटकटीतून शासकीय कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे.

 

विशेष म्हणजे या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहारालाही आळा बसण्यास मदत होणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या आशयाचा शासन निर्णय बुधवारी जारी केला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग नोंदवला आहे.


बदलीची प्रक्रिया अशी
एप्रिल व मे महिना हा नियमित शासकीय बदल्यांचा काळ असतो. या काळात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांनी त्यांच्या विभागातील रिक्त असलेल्या जागा आणि बदल्यांनंतर रिक्त होणाऱ्या संभाव्य जागांची माहिती जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या विभागांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करताना त्यांना अपेक्षीत असलेल्या बदल्यांच्या पसंतीक्रमादाखल दहा ठिकाणेही भरून घ्यायची आहेत.


या पसंतीक्रमासाठी एक नमुना अर्ज तयार करण्यात आला असून हा अर्ज बदलीसाठी इच्छुक असलेल्या किंवा नियमित बदलीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीने भरून द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध असलेल्या जागेवर आणि त्याच्या सेवाज्येष्ठतेनुसार संबधित
व्यक्तीची बदली करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बदल्या करताना केंद्र सरकारच्या धर्तीवर अपंग, विधवा, विकलांग यांच्यासह सहा निकष तयार करण्यात आले असून या निकषानुसार बदली देण्यात येणार आहे. तर जे निकषात बसणार नाहीत, त्यांची सेवाज्येष्ठता पाहून बदली करण्यात येणार आहे.

 

पोलिस विभागाला निर्णय लागू नाही
शासनाच्या बदली अधिनियम २००५ मधून पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे पसंतीक्रमानुसार बदलीचा निर्णय पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना लागू नसेल, असे याबाबतच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...