आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूसंपादन अधिसूचना रद्द- सेना, मंत्र्यांना अधिकार नाही- CM; नाणार प्रकल्‍पावरून वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी/मुंबई - काही करा ‘नाणार’ नाही देणार, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजापूरचा तेलशुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. दरम्यान, याच सभेत ‘नाणार प्रकल्पासाठी १८ मे २०१७ रोजी जारी काढलेली भूसंपादनाची अधिसूचना (नोटिफिकेशन) रद्द करण्यात येत आहे,’ अशी घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

 

मात्र काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा खुलासा केला. अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत, ते अधिकार उच्चाधिकार समितीला असतात. त्यामुळे नाणार प्रकल्पाची अधिसूचना अद्यापही कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, उद्धव यांच्या प्रकल्पविरोधातील भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील दरी यापुढे आणखी वाढत जाण्याची चिन्हे आहेत.

 

प्रकल्प गुजरातमध्ये किंवा विदर्भात न्या, काेकणात नको; सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात

- या कोकणाच्या पवित्र भूमीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. नाणार प्रकल्प गुजरातला जाईल, अशी भीती दाखवली जाते. हा प्रकल्प गुजरातलाच न्या, पाहिजे तर विदर्भात घेऊन जा; पण आपण कोकणचे गुजरात होऊ देणार नाही.   
- प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच गुजराती, मारवाड्यांनी इथे जमिनी कशा खरेदी केल्या? नाणारच्या जमिनी इतरांनी बळकावणे हा भूमाफियांचा घोटाळा आहे. नाणारमध्ये शहा, कटियार आडनावाचे शेतकरी आले कुठून? पैशाची किती मस्ती, जगात काहीही विकत घ्या, पण शिवरायांचे मावळे विकत घेतले जाऊ शकत नाहीत.   
- प्रकल्पातला अर्धा पैसा सौदी अरेबियात जाणार, बाकी तिथल्या मोदींच्या आणि उरलेला जमिनी घेतलेल्या माेदींच्या खिशात जाणार आहे. मग कोकणी माणसाने काय भांडी घासायची का? असे विचारत सत्तेत असलो म्हणून मांजर झालेलो नाही, वाघ अजून वाघच आहे.   
- नाणार प्रकल्प शिवसेनेने काेकणात आणल्याचा अपप्रचार काही लोक करत आहेत. मात्र सौदी अरेबियाशी करार केल्यानंतर हा प्रकल्प कोणी आणला हे स्पष्ट झाले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या व्हिलनचेच सौदीचा बोळा कोंबला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.  

 

डावलून निर्णय घेऊन दाखवावाच : परब  
‘अधिसूचना काढण्याचा अधिकार जर मंत्र्यांना आहे, तर ती रद्द करण्याचा अधिकारही मंत्र्यांना आहे,’ असा युक्तिवाद शिवसेनेचे प्रवक्ते अामदार अनिल परब यांनी केला. हाय पॉवर कमिटीला अधिसूचनेचा अधिकार आहे आणि मंत्र्यांना नाही, असे कुठल्याही कायद्यात म्हटलेले नाही.  मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात शिवसेनेचा विरोध डावलून प्रकल्पाचा निर्णय करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. अधिसूचना निघण्याच्या अगोदर भूमिपुत्रांच्या जमिनी विकत घेणारे शहा आणि मोदी कोकणवासी कधी झाले, कोकणात शेती कधीपासून करू लागले, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच मुख्यमंत्री या शहा, मोदी यांच्या बाजूने उभे राहणार की भूमिपुत्रांच्या? अशी विचारणा परब यांनी केली.

 

जनताच शिकवेल धडा :  खासदार राऊत    
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वराचे पाय चाटतात. फडणवीस कोकण उद््ध्वस्त करायला निघाले आहेत. मात्र, कोकणची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात केली..

 

ते देसाई यांचे वैयक्तिक मत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, प्रकल्पाबाबत उच्चाधिकार समितीत कोकण व महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. नाणार संदर्भातील अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा त्यांचे वैयक्तिक मत आहे, असेही ते म्हणाले.
 

आजपर्यंत गप्प का बसले? - मुंडे
देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? कॅबिनेट निर्णय झाला आहे का? हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असताना आजपर्यंत शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले?  अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का?’
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी हाेईल; ग्रामस्थांचा अाक्षेप...

 

हेही वाचा,
पाच महिने गप्प बसलेली शिवसेना जनक्षाेभ तीव्र हाेताच अाक्रमक !

भाजपला शह अन‌् काेकणचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी शिवसेनेची ‘नाणार’द्वारे धडपड

नाणारच्या शिवारातले डावपेच

बातम्या आणखी आहेत...