आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवास वनगांना पालघर लोकसभेची उमेदवारी जाहीर- उद्धव ठाकरेंकडूनही स्वबळाचा नारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2019 मधील लोकसभा निवडणुकीतून पालघरमधून श्रीनिवास वनगा हाच शिवसेनेचा उमेदवार राहील, अशी घोषणा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार नाही असे अप्रत्यक्ष सूचित केले. 

 

पालघरमध्ये आपण पराभूत झालेलो नाही. साम- दाम- दंड- भेद याविरूद्ध ही निवडणूक झाली. त्यामुळे पालघरचा पराभव मला मान्य नाही. आपण ही पोटनिवडणूक जिंकलेलोच आहे. अगदी कमी वेळात भाजपला घाम फोडला. नाटकं सुरू आहेत, पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दांत कडवा भाजपविरोधही कायम ठेवला. 

 

शिवसेना पक्षप्रमुख आज पालघर दौ-यावर आहेत. नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पालघरवासियांनी शिवसेनेला मोठा प्रतिसाद दिला. त्याबाबत लोकांचे आभार मानण्याकरिता व वनगा कुटुंबियांची भेट घेण्याकरता उद्धव डहाणूत आले आहेत. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी वरील भाष्य केले. तसेच अगदी कमी वेळेत व पालघरमध्ये प्रथमच निवडणूक लढवूनही शिवसेनेला अडीच लाखांच्या घरात मते दिल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांची पालघर लोकसभा मतदारसंघासाठी संघटक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. मी तुझ्या कायम पाठीशी आहे, तुला गरज असेल तेव्हा आवाज दे असे आश्वस्त करत वनगाला ताकद देणार असल्याचे जाहीर केले. 

 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्रीच मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यादरम्यान त्यांच्यात तब्बल सव्वादोन तास चर्चा झाली. यात तासभर बंद दाराआडही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, भाजप-शिवसेना यांची युती होईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आज सकाळी संजय राऊत यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे सांगितल्यानंतर आता उद्धव यांनी पालघरमध्ये तेच संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणे शक्य नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...