आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांनी टाळली तेलगू देसम पक्षाच्या खासदारांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व काँग्रेसव्यतिरिक्त राजकीय पक्षांचे समर्थन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांच्या शिष्टमंडळाला रविवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी असल्यामुळे ठाकरे यांनी सध्या ही भेट नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले. 


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी तेलगू देसम पक्षाचे खासदारांनी मागील काही महिन्यांपासून संसदेच्या सभागृहात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. शिवाय, याच मागणीवरून तेलगू देसम हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) आणि केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी सरकारमधून पायउतार झाला आहे. संसदेच्या मागच्या अधिवेशनातही तेलगू देसमच्या खासदारांनी संसदेचे कामकाज बंद पाडले होते. आता संसदेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. या पार्श्वभूमीवर तेलगू देसमचे लोकसभेतील गटनेते थोटा नरसिंहम आणि खासदार पी. रवींद्र बाबू यांचे शिष्टमंडळ रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळणे, कसे योग्य आहे, हे पटवून देणारी पुस्तिका उद्धव ठाकरे यांना देऊन त्यांचा या मागणीला पाठिंबा मागण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्यानेे शिवसेना या मुद्याशी सहमत नसल्याचे दिसत आहे. 


विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीत सामील न होण्याचे शिवसेनेकडून संकेत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अलीकडे उद्धव दररोज कठोर टीका करत असतात. तरीसुद्धा मोदी यांच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या 'टीडीपी'ला ठाकरे यांनी भेट नाकारली. त्यातून ठाकरे यांनी शिवसेना २०१९ च्या निवडणुकांत होऊ शकणाऱ्या तिसऱ्या आघाडीत कदापि सामील होणार नाही, हे संकेत दिल्याचा अर्थ काढला जातो आहे. 


शरद पवारांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह 
या पुस्तिकेत पाठिंब्याचे आवाहन करणारे तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सहीचे पत्रही आहे. मात्र, ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिलेली नाही, असे ठाकरे यांचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी सांगितले. या भेटीनंतर हे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार होते. परंतु ठाकरे यांचीच भेट न झाल्यामुळे पुढचा दौरा हे शिष्टमंडळ करणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...