आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 पासून भाजपचे पीक जोमात पण देशभरातील शेतकरी मात्र कोमात- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेतकरी आपले हाल उघडया डोळ्याने बघतो आहे. या सरकारच्या राजवटीत शेतक-यांचे उत्पन्न तर दुप्पट झाले नाही, पण शेतक-यांच्या आत्महत्या मात्र दुपटीने वाढल्या. 2014 पासून देशात 40 हजारांवर शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. याच काळात भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेले. शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय याचा विचार न करता मोदी सरकार पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटले आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट 2019 मध्ये होईलच! असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील शेतक-यांशी दिल्लीत बसून व्हिडिओद्वारे संवाद साधला. देशातील 600 हून अधिक जिल्ह्यातील शेतक-यांनी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. या मुद्यांवरून शिवसेनेने भाजप व पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. शेतक-यांशी संवाद साधताना मोदी काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती मात्र मात्र ‘शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार’  ही जुन्याच आश्वासनाची ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे झाले. यात नवे ते काय? 2014 च्या निवडणूक जाहीरनाम्यातही भारतीय जनता पक्षाने हेच आश्वासन शेतक-यांना दिले होते, असे सांगत उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप व मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

 

काय काय म्हणाले उद्धव ठाकरे यांनी-

 

- गर्जेल तो पडेल काय अशी एक म्हण मराठीत आहे. राष्ट्रभाषा हिंदीतही याच अर्थाने ‘जो गरजते है, वो बरसते नहीं’ ही म्हण वापरली जाते. विद्यमान राज्यकर्त्यांना ही म्हण चपखल लागू पडते. वारेमाप घोषणा, तीच ती जुमलेबाजी याचा देशातील जनतेला वीट आला आहे. तरीही राज्यकर्ते भानावर यायला तयार नाहीत.

 

- शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, या आश्वासनाला आता चार वर्षे उलटली. प्रत्यक्षात शेती आणि शेतकरी मात्र आहे तिथेच आणि आहे तसाच आहे. किंबहुना, पूर्वीपेक्षाही बिकट म्हणावी अशी परिस्थिती या राजवटीत झाली आहे. जी घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आले ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने मागच्या चार वर्षांत काय केले आणि शेतकऱयांच्या आयुष्यात खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत काय हे खरेतर पंतप्रधानांनी सांगायला हवे होते, मात्र ‘शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’  ही जुन्याच आश्वासनाची ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे झाले.  

 

- सरकारने दिलेले आश्वासन 2022 चे आहे हे मान्य; पण यातला निम्मा कालावधी तर संपला आहे. या चार वर्षांत शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही काय केले, हा खरा प्रश्न आहे. उत्पादन खर्चात कपात, शेतमालाला रास्त भाव, मालाची नासाडी रोखणे आणि शेतकऱयांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे अशा चार पातळय़ांवर सरकारचे काम सुरू आहे, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. हे काम खरोखरच सुरू असेल तर ते कुठेच दिसत का नाही?

 

- उत्पादनाचा वाढता खर्च ही शेतकऱयांची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. शेतकरी जे काही थोडेफार पिकवतो आहे ते खरेदी करतानाच सरकारची फॅ-फॅ उडते. शेतमालाची खरेदी करताना सरकार शेतकऱयांचा किती छळ करते हे काय जनतेला ठाऊक नाही? तूरडाळ खरेदीसाठी सरकारने शेतकऱयांना कसे रडवले, किती दिवस रांगेत उभे केले हे कसे विसरता येईल? अगदी अलीकडे हरभरा खरेदीच्या वेळीही शेतकऱयांचे असेच हाल झाले. म्हणजे उत्पन्न कमी असताना सरकार शेतकऱयांना आठ-आठ दिवस खरेदी केंद्रांवर उभे करीत आहे. मग हेच उत्पन्न उद्या दुप्पट झाले तर शेतकऱयाची अवस्था कालचा गोंधळ बरा होता अशीच होईल.

 

- बाजार समित्यांमध्ये येणारे शेतकऱयांचे धान्य पावसापाण्यात कसे बरबाद होते याची थेट दृश्ये देशभरातील वाहिन्या दाखवत असतात. साठवणुकीचे व्यवस्थापन सोडा, साधी शेडही कुठे नसते. सरकारी गोदामांची अवस्था आणि त्यात सडणारे धान्य यावर तर बोलायलाच नको. मग चार वर्षांत काय बदलले? ‘बहुत हुआ किसान पर अत्याचार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन तुम्ही सत्ता मिळवलीत, पण सरकार बदलल्यानंतर शेतकऱयांना खरोखरच न्याय मिळाला आहे काय? 

 

- आज कुठलीही बँक शेतक-यांना आपल्या दारातही उभी करत नाही. शेतीसाठी भांडवलच मिळणार नसेल तर कसे होणार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट? बँकांना चुना लावणाऱया बडय़ा उद्योजकांसाठी मात्र याच बँका गालिचे अंथरतात. मात्र आत्महत्यांच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची मागणी झाली की हेच सरकार दहा ठिकाणी वाकडे होते आणि सतराशे साठ अटी-शर्ती लादून शेतकऱयांची कर्जमाफी रखडवून ठेवते. हा सापत्न भाव आहे.

बातम्या आणखी आहेत...