आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलबदलू राजेंद्र गावीत वनगांचे राजकीय वारसदार कसे होऊ शकतात? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चिंतामण वनगा आयुष्यभर आदिवासी पाड्यांवर भगवा ध्वज हाती घेऊन काम करीत राहिले. मात्र त्यांची मरणोत्तर उपेक्षा करणे आणि राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार बरं का, असे आता जाहीर सभांतून सांगणे यालाच बेइमानी म्हणतात मुख्यमंत्रीसाहेब. मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे काही चालले नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेइमान, भ्रष्ट रामलू पाचोळय़ासारखे उडून जातील. बेइमानीचा पराभव सुरू झालाय अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर सडकून टीका केली आहे. 

 

सध्या पालघर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे सभांचा धडाका लावला आहे. फडणवीस यांनी एका सभेत शिवसेनेवर हल्लाबोल करताना दिवंगत वनगा यांच्या कुटुंबियांना शिवसेनेत घेत बेइमानी केली. तसेच राजेंद्र गावीत यांच्यासारखे दलबदलू लोक आयात करून हेच वनगांचे राजकीय वारसदार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सोबतच पालघरच्या प्रचारात पोस्टरवर स्वर्गीय वनगांचा फोटो लावून भाजपने मत मागण्यास सुरुवात केली. यामुळे शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

 

मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना 'सामना'च्या अग्रलेखात उद्धव ठाकरे लिहतात, पालघरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जोरदार टीका सुरू केली आहे. एखाद्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री, इतर फौजफाटा साग्रसंगीत उतरत असतो, तसा फौजफाटा पालघरलाही उतरला आहे. मंत्रालय ओस पडले आहे. महाराष्ट्राचे सर्व प्रश्न जणू सुटले आहेत आणि फक्त पालघरच्या पोटनिवडणुकीचा प्रश्नच तेवढा बाकी आहे असे सत्ताधारी भाजपचे वागणे आहे. पालघरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी थैल्या घेऊन त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळच उतरवले. मात्र अंतिम विजय हा शिवसेनेचाच होणार आहे. मुख्यमंत्री पैशांचा पाऊस पाडत आहेत. घोषणांचा धुरळा उडवीत आहेत. सारे मंत्रिमंडळ एका हातात पैशांच्या बॅगा व दुसऱ्या हातात दंडुका घेऊन पालघरात बसले आहे, पण सत्य व प्रामाणिकपणाचा म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचाच विजय होईल. कर्नाटकात आमदारांना विकत घेऊन राज्य आणू पाहणाऱ्या रामलूंसारख्या धनदांडग्यांचे काही चालले नाही. महाराष्ट्र तर शिवरायांची पवित्र भूमी आहे. पालघरला असे बेइमान, भ्रष्ट रामलू पाचोळय़ासारखे उडून जातील. बेइमानीचा पराभव सुरू झालाय, साहेब. पालघर ही त्याची नांदी आहे, अशा शब्दात उद्धव यांनी भाजपला फटकारले आहे.

 

आणखी काय म्हटले आहे अग्रलेखात-

 

- आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपने सुरू केलेल्या बेताल प्रचाराचे. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपकडून कोणी फिरकले नाही. मुख्यमंत्री सोडाच, पण जिल्हय़ातील संघ आणि भाजप परिवाराने पाठ फिरवली. 


- वनगा यांचे निधन दिल्लीत झाले. त्यांच्या निवासस्थानापासून ‘भाजप’चे कार्यालय पाच मिनिटांवर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाईंचे घर तीन मिनिटांवर. इतरही भाजप परिवार आसपास असतो. कोणी त्यांच्या पार्थिवावर फूल वाहण्यास गेले नाही. 


- वनगा यांनी सारी हयात ठाणे – पालघरच्या आदिवासी भागात संघाचा विचार व भाजप वाढविण्यात घालवली. त्यासाठी त्यांना शारीरिक हल्ले सहन करावे लागले. 

 

- वनगा हे मरेपर्यंत भाजपशी इमान राखूनच होते. त्यांच्या इमानदारीची किंमत मरणानंतर संपली व वनगा यांच्या कुटुंबाला जणू वाऱ्यावरच सोडण्यात आले. त्यानंतर ते सर्व कुटुंब शिवसेना परिवारात सामील झाले. यात मुख्यमंत्र्यांना बेइमानी वगैरे दिसत असेल तर राजभाषा कोश नव्याने लिहावा लागेल. 


- वनगा यांनी हयात भारतीय जनता पक्षात घालवूनही मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे धिंडवडे निघाले. कुटुंबाचे पालकत्व घ्यायला भाजपचा एकही मायका लाल पुढे आला नाही. तेव्हा ‘बेइमानी’ म्हणायचीच असेल तर ती ‘बेइमानी’ येथे आहे. 


- पालघरच्या प्रचारात पोस्टरवर स्वर्गीय वनगांचा फोटो लावून भाजपने मत मागण्यास सुरुवात केली. यावर चिंतामण वनगा यांच्या पत्नीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. हा सरळसरळ स्वर्गीय वनगांच्या नावाचा ‘गैरवापर’ आहे. 

बातम्या आणखी आहेत...