आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंडित नेहरूंवर टीका करता मग त्यांचेच धोरण का राबवता? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चीनशी मैत्री केली ती आपल्या अंगलट आली. पण नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. पण मोदी आता नेहरू यांच्या 'पंचशील'च्याच मार्गाने सध्याचे पंतप्रधान चीनचा प्रश्न सोडवू पाहत आहेत. नेहरू हे ‘पंचशील’चे उद्गाता होते. मोदी हे पंचसूत्राचे पाठीराखे बनले पण विचार नेहरूंचाच आहे. ‘‘युद्ध नको तर बुद्धच हवा’’ हे नेहरूंप्रमाणे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनाही पटले आहे असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर काय म्हणणे आहे? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चीन व इतर काही देशांचा दौरा करून भारतात परतले आहेत. मोदी यांचा चीन दौरा हा कोणत्याही विशेष अजेंड्याशिवाय होता असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यावरून शिवसेनेने पंतप्रधान मोदी व भाजप सरकारवर टीका केली आहे. 'सामना'त अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन तसेच अन्य देशांची मुशाफिरी करून हिंदुस्थानच्या ‘दौऱ्यावर’ परतले आहेत. मोदी यांच्या चीन दौऱ्यातून नेमके हाती काय लागले यावर आता चर्चा सुरू आहे. विदेश मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही विशेष ‘अजेंड्य़ा’शिवाय म्हणजे कामाशिवाय हा चीनचा दौरा होता. म्हणजे देशाचे पंतप्रधान हे बिनकामाचे आहेत व भरपूर मोकळा वेळ असल्याने ते सहज चीनला फेरफटका मारून आले. मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूक काळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, मग काय ते बघू अशी एकंदरीत मोदी यांची भूमिका दिसते, अशा शब्दांत उद्धव यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. 

 

चीन हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे सांगत उद्धव ठाकरे अग्रलेखात पुढे म्हणतात, चीन हा पाकिस्तानचा सगळ्य़ात मोठा पाठीराखा आहे. पाकिस्तान भारत सतत त्रास देत आहे तो चीनच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच. दहशतवादी राष्ट्र म्हणून जगाने पाकिस्तानला एकाकी पाडले, पण चीन मात्र पाकिस्तानला आजही मोठी मदत करीत आहे व भारताला अस्थिर करणे हाच त्यामागचा हेतू आहे. नेपाळ हे एकमेव हिंदूराष्ट्र चीनने गिळले आहे व चीनच्या प्रेरणेने नेपाळ भारताला दुश्मन मानू लागला आहे. बाजूच्या मालदीव, श्रीलंका, बांगलादेश व म्यानमारसारख्या राष्ट्रांतही चीनची घुसखोरी सुरू आहे. भूतानच्या सीमेवरील डोकलामला चिनी सैन्य जबरदस्तीने उभे करून भारताची डोकेदुखी वाढविण्याचे काम चीन करीत आहे, पण या एकाही विषयावर दोन देशांत चर्चा झाली नाही. अरुणाचलच्या सीमेवर भारताच्या हद्दीत चीनने बांधकामे सुरू केली आहेत. तिथून व उत्तराखंडात चिनी सैन्य नेहमीच घुसखोरी करीत असते. ही घुसखोरी लेह-लडाखपर्यंत सुरूच असून या विषयावरसुद्धा मोदी व शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली नाही, अशा शब्दांत मोदींच्या चीन दौ-यावर उद्धव यांनी टीका केली. 


मोदींनी चीन दौ-यात डोकलामचा विषय का काढला नाही असा सवाल करत उद्धव पुढे म्हणतात की, चीनला बरे वाटणार नाही व चहात मिठाचा खडा पडेल म्हणून त्यांनी ‘डोकलाम’चा विषय टाळला, पण जगाला दहशतवादापासून कसा धोका निर्माण झाला आहे यावर मात्र दोघांचे एकमत झाले आहे. पाककडून दहशतवाद्यांना पोसण्याचे जे ‘महान’ कार्य सुरू आहे त्यावर चर्चेत एका शब्दाने उल्लेख झाला नाही. पाकिस्तानला चीनने मदत करणे थांबवले तर दहशतवादास पायबंद बसेल ही वस्तुस्थिती असली तरी पाकिस्तानला आर्थिक रसद पुरविण्याचे काम चीन करीत आहे. तेव्हा पाकिस्तानचा उल्लेख टाळून दहशतवादावर प्रहार कसा होऊ शकतो? पण तरीही दोघांत चर्चा उत्तम झाली व दोन देशांतील सीमांवर शांतता नांदावी यावर एकमत झाले. चहाच्या टेबलावर चर्चा होत असताना मोदी यांनी स्वतः हातात चहाची किटली घेतली व हिंदुस्थानात चहा कसा बनवला जातो याची माहिती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिली. त्यामुळे चीनचे नेते खूश झाले, असे अग्रलेखात म्हटले.

 

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून जातो व आधीच्या मनमोहन सिंग सरकारने त्यास विरोध केला होता, पण हा गंभीर विषय दोघांच्या चर्चेत निघाला नाही. कोणत्याही वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे टाळले असे आमच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. मग मोदी यांनी चीनला जाऊन नेमके काय केले? मोदी यांनी जिनपिंग यांच्याबरोबर वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी छान मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी तलावात नौकाविहार केला, असे उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...