आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साम-दाम-दंड’ समजण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिकवणीस तयार, उद्धव यांचा फडणवीसांना टाेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोराचे ‘ऑडिओ क्लिप’बाबत वाक्युद्ध चालू आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला रविवारी आॅडिओ क्लिप प्रकरणाचे पडसाद उमटत राहिले. ‘ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य सादर केले नाही. अन्यथा ते तोंडावर पडले असते,’ असे शिवसेनेला प्रत्युत्तर देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही चांगलेच आव्हान दिले. ‘मुख्यमंत्र्यांनी ‘साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा, आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत,’ असे ते म्हणाले.  


उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना उद्धव म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना शिवसेनेवर कारवाई करायची असेल तर बिनधास्त करावी, पण क्लिपमधील आवाज त्यांचाच होता हे त्यांनी कळत-नकळत आता मान्यही केले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम- दाम- दंड-भेद आणि कूटनीतीचा अर्थ आम्हाला सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत.’  


उद्धव पुढे म्हणाले, ‘डिजिटल इंडिया त्यांच्याकडे आहे. ती आॅडिओ क्लिप खरी की खोटी, त्यात कुणी काय बदल केले, याची त्यांनी तपासणी करावी. ‘बूंद से गई वो हौद से नहीं आती,’ असे स्पष्ट करत उद्धव यांनी आॅडिओ क्लिपसंदर्भातील मुख्यमंत्र्यांची सारवासारव पूर्णपणे व्यर्थ धडपड आहे, असेच अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी किती लाेकांना दाम-दंड दिला : काँग्रेस

मुख्यमंत्र्यांच्या या आॅडिओ क्लिपसंदर्भात काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे रविवारी तक्रार दाखल केली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, ‘ऑडिओ क्लिपमधील मुख्यमंत्र्यांची भाषा ही आश्चर्यकारक, धक्कादायक आणि लोकशाहीला घातक आहे. यामध्ये साम, दाम, दंड, भेद असे शब्द वापरत असताना मुख्यमंत्र्यांकडून किती लोकांना दाम दिला, किती लोकांना दंडित केले व कुठले भेद केले याची विचारणा निवडणूक आयोगाने करावी.’  या निवडणुकीमध्ये भाजपकडून सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. अनधिकृत होर्डिंग भाजपचेच आहेत. मतदारांना पैसे वाटप करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाले असावेत, असा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातून निघतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...